तुम्हाला हा रस्ता नक्कीच एखाद्या पर्यटनस्थळाचा असल्याचा भास होत असेल. होय, हा रस्ता आहे अहमदनगर येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चांदबीबी महालाकडे जाणारा. हिरवागार निसर्ग, हवेत सुखद गारवा पडलेला, दिवाळीचा दुसरा दिवस..
अशा या सुंदर वातावरणात माझा मित्र राजेंद्र सांगळेसोबत आज महालावर आलो. पर्यटकांची बरीच गर्दी पहायला मिळाली. नगरचे तसेच अन्य शहरांतील नागरीक आपल्या कुटुंबीयांसह येथे आलेले. छान वाटलं ही गर्दी, हा सारा नजारा पाहून.
ही भव्य वास्तू पाहून पर्यटक हरवून जातात इथल्या इतिहासात. जाणून घेतात इतिहासाला. येथे जेव्हा येतो तेव्हा हे असं दृश्य कायमचं नजरेस पडत असतं. आनंद वाटतो आमच्या शहरात येणारी पर्यटकांची ही गर्दी पाहून.
खरेतर पुरातत्त्व खात्याने हे हेरून पर्यटकांसाठी येथे सोयी सुविधा करीत परिसराचा विकास करायला हवा. पंचशताब्दीचा समृध्द वारसा लाभलेलं हे शहर एकेकाळी निजामशाहीची राजधानी असलेलं शहर होतं.
दुर्दैवाने आम्हाला याची गरिमा कधीही कळली नाही. माननीय जिल्हाधिकारी शहराच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु येथील राजकीय धुरिणांनी, नगरकरांनी देखील शहराच्या ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील असायला हवं.
ही काळाची गरज आहे. निदान उद्याच्या पिढीने आपल्या बाबतीत कौतुकाचे दोन शब्द काढीत कृतज्ञता तरी व्यक्त करायला हवी. दोन, तीन वर्षांतून किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा फार्स म्हणजे विकास नाही.
तर, इथल्या ऐतिहासिक, धार्मिक, वास्तूंच्या दुरुस्तीसाठी, परिसराच्या विकासासाठी जर गांभिर्याने लक्ष देत केंद्र सरकारकडून भरीव निधी आणला, एमटीडीसीच्या निर्मितीची मान्यता आणली, तर हे शहर भविष्यात पर्यटनाच्या नकाशावर नक्कीच येईल.
यामुळे शहराची भरभराट होईल. रोजगार मिळाल्यास आर्थिक उलाढाल होईल. साईबाबा, शनिशिंगणापूर येथे जाणारे हजारो भाविक रोज आपल्याच शहरातून जातात. ते येथे थांबतील, शहराचा इतिहास जाणुन घेतील. बाजारपेठेत फेरफटका मारत खरेदी करतील. व्यापाऱ्यांची दुवा मिळेल तुम्हाला.
नाहीतरी आपल्या शहराची आज असलेली ओळख खूप काही चांगली नाही. 'खराब रस्त्यांचं, खड्ड्यांचं, नैसर्गीक ओढे नाले बुजवणाऱ्यांचं शहर', ही तर आपली ओळख आहे बाहेर. हे दुर्दैवाने वास्तव आहे.
ते स्वीकारायलांच हवं येथील सर्व पक्षातील राजकीय नेत्यांनी. सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी काढलेले शहर विकासाचे निवडणुकीतील जाहीरनामे पाहिले की, बँड बाजा लावून वरात काढावी वाटते.
एमआयडीसीची पिछेहाट झाली आहे. उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलती नाहीत. मोठे कारखाने येथे येण्यासाठी कोणतेही प्रयत्न नाहीत. इथला तरूण याला वैतागून नोकरीच्या शोधात अन्य शहरात परागंदा झालेला. ही आपली खरी शोकांतिका..!
राजकारण म्हणजे केवळ अफाट पैसा कमवायचा एवढ्यावरच हे क्षेत्र स्तिमित नसतं. तर कर्तव्य, जबाबदारी म्हणून शहराच्या विकासाच्या संदर्भात ठोस पावले उचलली जायला हवीत. मग लोकांच्या मनात मंदिर निर्माण होईल तुमचं..!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)