मला आता खूप काळजी वाटू लागलीय
माझ्या शहराची...
अगदी लहानपणापासून पाहतोय मी त्याला...
खेळताना, हसताना, बागडताना...
त्याचे लाड करणारी,
त्याला जपणारी..
काळजी घेणारी...
खूप माणसे होती त्याच्या गणगोतात..
पक्षांचा विहार असायचा...सूर्याचा कोवळा प्रकाश शहराची काळजी घ्यायला हळूच डोकवायचा...नदीला किनारा होता...झुळझुळ वाहणारे पाणी होते...
बागा असायच्या...
शहराची नातवंड खेळायची...
मुली फेर धरायच्या...
काय हवं काय नको हे पाहणारी माणसे होती...
वर्षे निघून गेली...
ती ही दिसेनाशी झालीत...
शहराला कधी भेटाव वाटलं..की येतो त्याच्या जवळ...वृध्द झालेला, जीर्ण, म्हातारा झालेला असतानाही घेतो तो मलाही आपल्या मांडीवर...पण,
नाही पाहवत आता त्याची शून्यातली नजर...
त्याच्या डोळ्यांतील आसवं...
थकलेला त्याचा विषण्ण चेहरा...
त्यानं ज्यांना वाढवलं, मोठं केलं...
ती ढुंकूनही पाहत नाहीत आता त्याच्याकडे...
त्याच्या वेदना, त्याच्या जखमा तशाच ओघळत आहेत...
रक्त वाहून सुकुनही गेलं...
पण नाही वेळ कोणाला...
त्याची शुश्रुषा तर राहिली दूर पणंत्याची संपत्ती, त्याच्या जमिनी लुटूनत्याच्या बोटाला शाई लावून,त्याचा गळा दाबून ठसा घेणारी त्याची माणसंही पसार झालीत..त्याच्यापासून..
तो विव्हळतोय...
रडतोय...
तरीही त्यांना भेटायला आसुसलांय...
त्याचं होत नव्हत सारं लुटून खायच्या मागे लागलीत..
तरीही,
माझी माझी म्हणत तो बोलवतोय,हात जोडतोय..परवा त्याची नदी लुटली..ओढ्यांचा गळा घोटला...रस्ते संपवले...बागा बंद केल्या...कसली आली शहराला जपायला निघालेली ही जमात...
आता काळजी वाटू लागली मला माझ्या या शहराची...
रात्री त्याचा गळा चिरायला,
त्याला संपवायला निघाली होती ही सारी...
पणं वृध्द झालेलं हे शहर..
ते दिसताच,
अंधारात एका कोपऱ्यात दडून बसलं लपून..
लुटारूंनी खूप शोधलं त्याला...दाराला काठ्या,दगडं मारली...थरथरत्या हातांनी स्वताला वाचवत...डोळे बंद करीत निपचित लपलेलं...कसंबसं वाचू शकलेलं..
आता कधीही घायाळ होईल...
नेम नाही..
काळजी वाटू लागली आहे मला आता या शहराची...
त्या रात्री अंधारात मारायला आलेली ती लुटारू टोळी पुन्हा येईल..
अचानक...जीव घेतील त्याचा एकदाचा...आम्ही आहोतच हा सगळा तमाशा पहायला,शहराचे सन्माननीय नागरीक...चेहरा नसलेले..
हो. खरंच,
काळजी वाटू लागलीय मला आता या शहराची...!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)