औरंगाबाद - येथील पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजाची विक्री करायला आलेल्या टोळीला जेरबंद केले आहे. आरोपींच्या ताब्यातून तब्बल ३४ किलो गांजा, आलिशान इनोव्हा कार, असा सुमारे ११ लाख ३० हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.
बेगमपुरा पोलिसांना माहिती मिळाली होती की, आम्रपाली नगर विद्यापीठ गेटसमोर काही लोकं आलिशान कारमध्ये गांजा विक्रीसाठी आणणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी फॉरेंन्सीक एक्सपर्ट टीमसह सापळा लावला.
एक इनोव्हा कार येताच पोलिसांनी तात्काळ छापा मारला. तेव्हा त्यातील आरोपींनी गाडी थांबून पळून जाण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेत चौकशी केली.
सुरेश रावसाहेब सागरे ( वय- २४ वर्षे, धंदा- ड्रायवर, रा. सुरेवाडी, औरंगाबाद), सागर भाऊसाहेब भालेराव (वय- २५ वर्षे, रा. वाघलगाव, ता. फुलंब्री), संदेश दिलीप ठाकुर (वय- २४ वर्षे, रा. मयुरपार्क औरंगाबाद) , शंकर भीमराव काकडे (वय- २४ वर्षे, रा. आम्रपाली नगर, विद्यापीठ गेटसमोर औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले.
पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार, फौजदार विनोद भालेराव, विशाल बोडखे, पोलिस नाईक हैदर शेख, सोनवणे, कचरे, एखंडे, ज्ञानेश्वर ठाकुर, विजय निकम, शरद नजन, चव्हाण, मुरकुटे यांनी ही कामगिरी केली.
गाडीची पाहणी केली असता, त्यात तब्बल ४ लाख ८ हजार २२८ रुपये किंमतीचा ३४ किलो गांजा आढळला. पोलिसांनी इनोव्हा कार, २२ हजारांचे ४ मोबाईल आणि रोकड, असा एकूण ११ लाख ३० हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला.
या चारही आरोपींविरुद्ध बेगमपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चौघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.