पहिली माझी ओवी गं
बाईच्या जन्माला..
पहिली बेटी तूप रोटी..!
दुसरी माझी ओवी गं
तिच्या लडिवाळ शब्दाला,
झंकारणाऱ्या पैंजणाला..!
तिसरी माझी ओवी गं
बाईच्या पाळीची
स्वागत सृजनाचे, रंग वेदनांचे..!
चौथी माझी ओवी गं
तिच्या साक्षरतेची,
संघर्षातून येणाऱ्या शिक्षणाची..!
पाचवी माझी ओवी गं
शेतावरल्या भांगलणीची
तिच्या कष्टाला येणाऱ्या मोत्याची..!
सहावी माझी ओवी गं
नोकरी करणाऱ्या लेकीची
अनेक जागी एका वेळी
युध्द लढणाऱ्या मातेची..!
सातवी माझी ओवी गं
शस्त्र चिकित्सक सखीची
जीवदान देणारी असते ती
आई अनेक लेकीबाळींची..!
आठवी माझी ओवी गं
जगाची सिस्टर म्हणवणाऱ्या
लेकीची..
सेवा दिनरात चालते या नाईंटिंगेलची..!
नववी माझी ओवी
पाळणाघराच्या यशोदेची
सांभाळते ममतेने लेकरं
परक्याची..!
दहावी माझी ओवी गं
सफाई कामगार भगिनीची
हसतमुखाने कचरा नेते,
पण भाकर खाते कष्टाची..!
अकरावी माझी ओवी गं
अक्षरओळख देणाऱ्या शिक्षिकेची
देशाचा पाया मजबूत करणाऱ्या
सावित्रीआईच्या लेकीची..!
बारावी माझी ओवी गं
राजकारणाचा गड लढणाऱ्या
रणरागिणींची..
स्वतःचे अस्तित्व
तडफेने दाखवणाऱ्या
लेकींची..!
स्वप्नजा,
तेरावी माझी ओवी गं
माझ्या गृहिणीची
आवडी-निवडी जपते,
काळजी घेते
साऱ्या घराची..!
चौदावी माझी ओवी गं
अभिनय करणाऱ्या अभिनेत्रीची
मनोरंजन करते,
पण जपते प्रतिमा स्त्रीची..!
पंधरावी माझी ओवी गं
लेखणीने विचारधन देणाऱ्या
लेखिकेची..
बरं नाही पण खरं लिहणाऱ्या
अगणित तेजस्वींनींची..!
ओव्या माझ्या लेकींच्या
दुर्गा या भारताच्या.!
नका पूजू नका मखरात बसवू
माणूस म्हणून सन्मान देऊया..
बस्स इतकचं करुया..!
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)