क्राईम ब्युरो - सोमवारी मध्यरात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर प्रमुखाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना परभणी शहरात रात्री दोन वाजण्याच्या सुमारास झाली. मनसे शहर प्रमुख सचिन पाटील यांची हत्या झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार किरकोळ वादातून हा खून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. राजकीय नेत्याची हत्या झाल्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. राजकीय वादातून किंवा मित्रानेच त्यांचा काटा काढल्याची चर्चा आहे.
सचिन पाटील यांची किरकोळ वादातून हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र यामागे खरे कारण काय आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. पाटील यांच्या मित्रानेच या हत्याकांडाचा कट रचल्याची शंका देखील व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. राजकीय नेत्याची हत्या झाल्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. आरोपींचा शोध घेतला जात आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
याशिवाय पोलिसांकडून पाटील यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली आहे. वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात असल्या तरी लवकरच या प्रकरणाचा सुगावा लागेल, असा विश्वास परभणी पोलिसांनी व्यक्त केला आहे.