क्राईम अपडेट - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी शहरप्रमुख सचिन पाटील यांचा मंगळवारी (६ सप्टेंबर) पहाटे ३ वाजेच्या सुमारास मित्रानेच चाकूने वार करत खून केला. पाटील मित्रांसोबत पत्ते खेळत असताना त्यांच्यात वाद झाले. यातूनच त्यांचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे.
सचिन पाटील यांचा भाऊ संदीप ऊर्फ रिंकू पाटील यांनी परभणीतील नवा मोंढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री मनसे शहरप्रमुख सचिन पाटील, विजय जाधव व इतर मित्र वसमत रोडवर शिवरामनगरमध्ये गिरीश ऊर्फ टिल्या रेवले यांच्या घरी होते.
तेथे त्यांचा पत्त्यांचा डाव रंगला होता. याच वेळी सचिन आणि विजय या दोघांमध्ये बाचाबाची झाली. मी मोठा की तू मोठा, या किरकोळ कारणावरून दोघांत जोरदार भांडण जुंपले. शिवीगाळ, हमरीतुमरी करून दोघांत हाणामारीही झाली.
इतर मित्रांनी हे भांडण सोडवायचा प्रयत्न केला. पण विजयने सचिन यांच्या मानेवर आणि पाठीवर चाकूने वार केले. इतर मित्रांनी पाटील यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले. परंतु तोपर्यंत त्यांचे प्राण गेलेले होते.
आरोपी जाधव हा तेथून पसार झाला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संदिपान शेळके हे करत आहेत. मनसेच्या अधिकृत ट्विटर पेजवर सचिन पाटील यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे.
ही बातमीही वाचा - खळबळ ! मनसेच्या 'या' नेत्याची निर्घृण हत्या, मित्रानेच 'कांड' केल्याचा संशय