‘लम्पी’ नियंत्रणासाठी 'या' कलेक्टरकडे जालीम उपाय.. ५५२ गावांमध्ये उपक्रम

ब्युरो रिपोर्ट - पशुधनावरील ‘लम्पी’ चर्मरोग हद्दपार करण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन तत्पर असून जिल्ह्यातील ५५२ गावातील ३ लाख पशुंचे यशस्वीपणे लसीकरण केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.

जिल्ह्यात ४७८ जनावरे बाधित आहेत. त्यापैकी २१७ जनावरे बरी झालेली आहेत. शासन शेतकरी व पशुपालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पशुंचा लम्पी रोगाने मृत्यु झाल्यास पशुपालकांना जिल्हा नियोजन निधीमधून नुकसान भरपाई ही देण्यात येणार आहे.

‘लम्पी’ चर्मरोग हा पशुंमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो तत्पर उपचार सुरू केल्यास निश्चित बरा होतो. लम्पिमुळे पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने पशुपालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी भोसले यांनी केले.

या रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढू नये, पशुसंवर्धन विभागाने १०० टक्के लसीकरण पूर्ण करावे, या रोगाबाबत कुठलाही संभ्रम निर्माण होणार नाही. यासंदर्भात दक्षता घ्यावी. रोगाची योग्य माहिती पशुपालकांपर्यंत पोचवावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

जिल्ह्यात यापूर्वीही २०२०-२१ मध्ये ३२ गावांमध्ये व २०२१-२२ मध्ये २७ गावात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळला होता. मात्र यामध्ये एकाही पशुधनाचा मृत्यु झाला नव्हता. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. बाधित पशुधनासाठी मोफत उपचार घ्यावेत.

खासगी वा शासकीय पशुवैद्यकांनी या साथीच्या उपचारासाठी शुल्क आकारणी केल्यास किंवा याबाबत काही तक्रार असल्यास, विभागाच्या जिल्हा उपआयुक्त किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र. १८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर टोल फ्री क्र. १९६२ येथे तात्काळ संपर्क साधावा.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !