एखादी व्यक्ती अंतर्मुख (Introvert) असते म्हणजे ती भित्री असते का.? इतरांच्यात मिसळण्यासाठी बोलक्या (Extrovert) व्यक्तींपेक्षा थोडा जास्त वेळ घेणारी, काहीशी रिझर्व्ह वाटणारी माणसं कालांतराने मैत्री झाल्यावर खूप बोलतात हे तुम्ही अनुभवलं असेल.
हवा, पाणी, हॉटेलिंग, शॉपिंग यावर काही मिनिटंही न बोलू शकणारी माणसं कदाचित आयुष्यावर, तुमच्या भाव भावनांवर तासनतास बोलू शकतात. ते चांगले श्रोते असतात, समोरच्याला व्यवस्थित ऐकून घेतात. बरेचदा अशा माणसांकडे अनेक जण आपलं मन विश्वासाने मोकळं करतात.
एखाद्या सुरक्षित स्थळी ठेव ठेवावी आणि जरा निश्चिन्त व्हावं ना, अगदी तसं..! दरवेळी, प्रत्येक विषयावर किंवा घटनेवर उत्स्फुर्तपणे बोलणं जमत नसेल, पण अशी माणसं कधीतरी एखाद्या विषयावर एखाद्या व्यासपीठावर सभाधीटपणे बोलू शकतात. मग आजूबाजूच्या माणसांना वाटतं अर्रे..? याला किंवा हिला बोलताही येतं ?
कुणाला असं आश्चर्यचकित करण्याचा हेतू नसतो, पण काय होतं बहुतेक वेळी अंतर्मुख माणसं इतरांपेक्षा जरा जास्त विचार करतात. ते संवेदनशील असतात. त्यांची श्रवणक्षमता बरी असते. कदाचित आपलं मत मांडण्यापूर्वी ते नीट विचार करतात.
एखादा माणूस खूप बोलका आहे म्हणून तो वाईट नाही. तशीच अंतर्मुख माणसंही आपल्या नैसर्गिक स्वभावानुसार वागत असतात. व्यक्त होत असतात. पण कधीकधी त्यांना चुकीचं समजलं जातं. कुणी त्यांना शिष्ट समजतं तर कुणी त्यांच्या सावध वागण्याला भित्रेपणाचं लेबल लावतं.
पण आजवर ही माणसं स्वतःच स्वतःला सांभाळत आलेली असतात. जग किंवा त्यांना जज करणारी माणसं दर वेळी त्यांच्या मदतीला धावून येत नाहीत. शेवटी या जगात प्रत्येकाला काही गोष्टी स्वतःसाठी स्वतःच कराव्या लागतात, हा नियम सर्वांप्रमाणे त्यांनाही लागू होतो.
उलट मदत मागण्याचीही भीड बाळगून असल्याने अनेक कामं स्वावलंबनाने करण्याची त्यांना सवय असते. थोडी लाजाळू असलेली माणसंही प्रसंगी आपलं प्रामाणिक मत स्पष्टपणे, ठामपणे मांडू शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचा त्यांच्या कार्यक्षमतेशी तर मुळीच संबंध नसतो.
अगदी नियमित संवादकौशल्याची (कम्युनिकेशन स्किलची) कामंही ती व्यवस्थित करू शकतात. बोलकी माणसं कधीकधी कमालीची फटकळ वाटू शकतात. त्यांचा हेतू कुणाला दुखावण्याचा नसला तरी पटकन बोलण्याने असं होऊ शकतं. पण त्यांच्या मनात काही चुकीचं नसतं.
हे जितक्या सहजतेने स्वीकारलं जातं ना तसं.अंतर्मुख माणसांच्या सुरुवातीला थोडं reserved असण्याला समजून घेतलं जात नाही. स्थिरचित्त किंवा क्वचित प्रसंगी लाजाळू असणं म्हणजे मंद, मूर्ख असणं नव्हे. त्यांच्या संयमाला, विनम्रतेला भित्रेपणाचं लेबल लावता कामा नये.
सचिन, राहुल आणि विराट या तीन खेळाडूंना विचारात घेतलं तर सचिन आणि राहुल द्रविड म्हणताच समोर येते संयमी खेळी. कुठे व्यक्त होतानाही कमी शब्दात, सौम्यपणे व्यक्त होणं. आपल्या कामावरच्या टीकेवर, कार्यक्षमतेवरच्या प्रश्नांवरही त्यांनी उत्तरं दिली ती आपल्या कामातूनच.
विराटकडे मात्र aggression आहे जे एखाद्या नेतृत्वाकडे शोभून दिसतं. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यांच्या स्वभावाचे हे पैलू मैदानावरच्या त्यांच्या देहबोलीतही सहज दिसतात. आणि तीच त्यांची ओळख आणि स्वतंत्र शैली/युनिक स्टाईल आहे. या शैलीवरून ते बरेवाईट खेळाडू ठरत नाहीत.
प्रत्येकजण आपापल्या जागी उत्कृष्ट आहे, हे त्यांनी केलेले विक्रम सांगतातच. देवाने, निसर्गाने आपल्यापैकी प्रत्येकाला वेगवेगळी कौशल्य आणि वेगवेळ्या पद्धतीने व्यक्त होण्याची कला दिली आहे. त्यानुसार आपण व्यक्त होतो.
बरेचदा परस्परविरुद्ध गुण असलेली माणसं एकमेकांना समजून घेतलं तर परस्पर पूरक ठरतात ज्याचा फायदाच होतो. त्यामुळे आपल्या जीवनात, एकंदरीत या जगात नावीन्य आहे. समजून घेतली तर इतकी सहज आहे ही गोष्ट.!
शेवटी काय.. माणूस समजून घेणं ही मॅगीसारखी इन्स्टंट वाटणारी गोष्ट नाही. 'फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन' सारख्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या घासून गुळगुळीत केलेल्या गृहीतकांनाही चुकीचं ठरवण्याची क्षमता माणसाच्या भावनांमध्ये आहे.
माणसं आपल्यापेक्षा वेगळी असू शकतात, माणूस म्हणून चांगली मूल्य आणि माणुसकी जपणं याशिवाय इतर सगळे निकष (क्रायटेरिया) गौण ठरतात. ती आहेत तशी स्वीकारता येणं ही सुद्धा एक कला आहे. ती अवगत झाली की बहुधा जगणं सोपं होतं. नाही का ?
चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेला बाप्पा माझ्यासहित आपल्या सर्वांची ही कला उत्तम करो हीच बाप्पाचरणी प्रार्थना.
- अमिता पाटील (अहमदनगर)