क्राईम ब्युरो - 'हनी ट्रॅप'चा एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीने एका युवकाकडून तब्बल ६७ लाख रुपये वसुल केले आहेत. गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन या युवतीने तरुणाकडून पैसे उकळले.
चेतन हिंगमारे (हडपसर) निखिल म्हेत्रे (हडपसर) आणि एका युवतीवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या युवतीची फिर्यादी युवकसोबत सोशल मीडियावर ओळख झाली होती. नंतर त्यांची मैत्री झाली.
या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. काही दिवसांनी त्यांनी शरीरसंबंध ठेवायला सुरुवात केली. याचवेळी मुलीने पैसे मागायला सुरुवात केली होती. सुरुवातीला तरुणाने नकार दिला असता त्याला धमकवण्यात आले.
त्याने याचना करूनही या युवतीने तिच्या दोन मित्रांसह त्याच्याकडून पैसे उकळले. याप्रकरणी युवकाने फिर्याद दाखल केली. पुण्यातील कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये तिघा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर धमक्या, ब्लॅकमेलिंगचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. त्यातुन लोक पैसे उकळत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तींशी बोलताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.