..म्हणुन परमेश्वर सतत भोवताली असल्याचा भास होत राहातो.!

#Avian_Trails चं हे चित्र मला फार आश्वासक वाटलं. चित्र मुद्दामहून म्हणालो, खरं तर हा एक उत्तम फोटो आहे. ही जगातली सगळ्यात सुंदर फोटोग्राफी आहे असंही मी म्हणेन.

काल हेच चित्र मी व्हॉट्स्अप स्टेट्सला शेअर केलं होतं. त्याखाली मी कॅप्शन लिहिलं होतं - 'म्हणूनच परमेश्वर सतत भोवताली असल्याचा भास होत राहतो..' कित्येकांना याचा अर्थ उमगला नाही. काही व्यक्तींनी या कॅप्शनचा फोटोशी काय संबंध? असंही विचारलं.

चित्रात दिसणारं झाड आणि त्यावर बसलेले पक्षीही मला परिचित नाहीत. त्यांची नावे शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु खात्री नसल्याने मी ते इथे नमूद करत नाही. महत्वाचं म्हणजे कॅप्शन असं लिहिण्यामागचं कारण काय? तर हा कदाचित माझ्यापुरता मर्यादित विचार असेल म्हणून सांगतो..

चित्रातलं झाड निष्पर्ण दिसतंय, अशा शुष्क झाडाच्या फांदीवर कधीही कोणताच पक्षी बसलेला, रमलेला मी जास्त बघितला नाही. किंबहुना आपल्यासारख्या नजरेला देखील पाना-फुलांनी डवरलेली झाडंच पसंद पडतात.

मग अशी रुक्ष वाटणारी, निष्पर्ण झाडे ओसाड जागांवर एकटी उभी असतात. परंतु परमेश्वर हा अजब कलाकार आहे असं मी नेहमी म्हणतो. तो कधीही, कुठेही असं काही करतो की ज्यामुळे क्षणात परिस्थिती बदलून जाते. या चित्राचंच बघा ना.

ओसाड जागेवर रुक्ष वाटणाऱ्या या झाडावर असे रंगीन पक्षी येऊन बसले की त्या झाडांना पानं, फुलं काहीही नसताना त्याहून जास्त आकर्षण निर्माण झालं. माणसाचंही असंच असावं. गतकाळात मी अनुभवलंय हे.

एक काळ होता, काही वर्षांपूर्वी मी प्रचंड कष्ट करायचो. परंतु फार म्हणावं असं काही समाधान मिळत नसायचं. तरीही निराश न होता करत राहणं इतकंच आपल्या हातात होतं. त्यावरून काहींनी मला तिरस्कार केल्याचंही आठवणीत आहे.

मात्र आता हे इतकं काही बदललं की कल्पतरू प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. माझे काही मित्र विचारतात - तुला टेन्शन येतं नाही का रे? सतत हसत असतो? त्यावर फक्त स्माईल करणं इतकंच माझं उत्तर आहे. खरंच काय उत्तर देऊ मी ?

कोविड काळानंतर फार काही सोडून दिलं मी. एखाद्याने शिवी दिली तरी त्यालाही स्माईलच देतो मी. लाज त्याची त्याला वाटायला हवी, कारण विकृत तो असतो आपण नाही. राहिला प्रश्न उत्तर देण्याचा, ते काम वेळ चांगलं करते. त्यामुळे विकृतीला उत्तर देत आपणही मनात द्वेषबुद्धी तयार करू नये.

तसंही मी कंटेंटच्या क्षेत्रात काम करतो, सतत काहीतरी चिंतन सुरू असतं. ही साधना आहे, असं मानलं तरी योग्यच वाटेल. पण फार मजा येते, असं कोणालाही नसेल अनुभवता येत इतकं सुंदर जग आहे माझं. खरं सांगायचं तर आपले विचार एवढंच याचं उत्तर आहे.

सतत प्रसन्न राहण्यासाठी नेहमी चांगलाच विचार करावा मग तो स्वतःबद्दल असो की इतरांबद्दल. आपलेच विचार कृती बनून आपली नियती होत राहतात, विचारांचं परावर्तित होणं आपल्याला सुख किंवा दुःख देत असतं.

चांगले विचार म्हणजेच ईश्वराचा सहवास असतो ना? विचार कर्म, कर्म नियती, अन नियतीच तुमचं आयुष्य होते. हे साधं समीकरण आहे. म्हणून मी प्रचंड सुखी आहे. या चित्रातल्या झाडासारखा. इतकी सुंदर नक्षी फक्त आणि फक्त परमेश्वरच चितारु शकतो असा माझा विश्वास आहे.!

- कृष्णा बेलगांवकर (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !