अंबाजोगाई (बीड) - वडिलांचे छत्र हरवलेल्या विनायक अर्जुन भोसले याने एकही शिकवणी न लावता तिसऱ्या प्रयत्नात नीटमध्ये (५९५) गुण प्राप्त केले. प्रतिकुल परिस्थितीत त्याच्या आईने भाड्याच्या खोलीत राहून मोलकरणीचे काम करून त्याला शिक्षण दिले. या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
मुलाला डाॅक्टर व्हायचं असेल, तर मोठ्या शहरात जावून चांगल्या महाविद्यालयात प्रवेश, नावाजलेल्या क्लासला भरपूर फी देऊन क्लास लावावे लागतात, तरच डाॅक्टर होता येते, हा समज विनायकने खोडला आहे.
कुठलाही खासगी क्लास नसताना एका ॲपवर ऑनलाईन क्लास करूनही नीटमध्ये यश मिळवता येते हे या विनायक भोसले याने सिध्द केले आहे. फक्त त्याला हे यश प्राप्त करण्यास तीनदा परिक्षा द्यावी लागली येवढेच. यात त्याची जिद्द व कष्ट महत्वाचे ठरले आहेत.
विनायकचे मुळ गाव सेलू (ता. परळी वैजनाथ) हे आहे. आठ वर्षापुर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. पतींच्या पश्चात दोन्ही मुले व एक मुलगी यांना सांभाळण्याची जबाबदारी विनायकाच्या आई सुनिता यांच्यावर आली.
मुले लहान असल्याने, त्यांनी काही दिवस खासगी शाळेत सेवकाचे काम केले. एका छोट्या गावात राहून दोन्ही मुलांना माजलगावच्या शाळेत शिक्षण दिले. विनायकने अक्षरश: घरची म्हैस राखून दहावीचे शिक्षण घेतले.
इयत्ता दहावीत त्याने ८२ टक्के गुण घेतले. मुलगा हुशार असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या आईने मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी अंबाजोगाईत आणले. घरोघरी कपडे धुनी, भांड्याची कामे करू लागल्या.
मोठा मुलगा परिस्थिती अभावी अकरावी विज्ञानचे शिक्षण सोडून हाॅटेलवर काम करू लागला. विनायकने अंबाजोगाईत जोधाप्रसाद मोदी उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला. घरी अभ्यास होत नाही, म्हणून विनायकने लातूरला खोली केली.
खासगी क्लास लावण्यासाठी पैसे नव्हते. मात्र तिथे त्याने मित्राच्या सहकार्याने खासगी क्लास न लावता अभ्यास केला. पहिल्या प्रयत्नात यश न आल्याने, तो लातूरची खोली सोडून अंबाजोगाईत परतला, पुढील दोन वर्षे त्याने ऑनलाईन अभ्यास केला.
यंदाच्या नीट मध्ये त्याने ५९५ गुण घेऊन यश प्राप्त केले. यामुळे त्याचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जवळपास प्रवेश निश्चित होईल. विनायक हा बारा तास अभ्यास करीत होता. स्वत: नोट्स काढून सराव केल्यामुळे त्याने ही यशाला गवसणी घातली.
मोबाईलवर अभ्यासक्रमाचा ॲप घेऊन, त्याने हा अभ्यास केला. परंतु त्यात सातत्य ठेवल्याने गुणवत्ता सिध्द करता आली. मोठ्या भावाने स्वत:चे शिक्षण थांबवून नोकरी केली व मला प्रोत्साहन दिले. त्यामुळे हे यश प्राप्त करू शकलो अशा भावना विनायकने व्यक्त केल्या.
विनायकने प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेल्या यशाबद्दल शिक्षणासाठी मदत मिळवून देत त्यास आधार देण्याचा संकल्प 'आधार माणुसकी'चे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी केला. यावेळी विनायकच्या कुटुंबाचा सत्कार केला. याप्रसंगी रवींद्र लोमटे, परमेश्वर भिसे यांची उपस्थिती होती.