अहमदनगर ते कल्याण रोडवरील माळशेज घाट हा पावसाळी आनंद घेण्याचा.. पावसात चिंब भिजण्याचा पर्यटकांचा आवडता स्पॉट झालाय. या घाटात अनेक हॉटेल्स तर आहेतच, पण शासनाच्या एमटीडीसीचा रिसॉर्ट आहे.
पावसाळ्यात पर्यटकांची वर्दळ तर असतेच, त्याचबरोबर इतर वेळी येऊन पर्यटनाचा आनंद घेणारी मित्र मंडळी, अनेक कुटुंबे येथे येत असतात. गरमागरम भजी, चहा, भाजलेली मक्याची कणसे हे या घाटातील पर्यटकांचे, या घाटातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे आवडते खाद्य..
अन् खरंच इथल्या वातावरणात निसर्गाचे सुंदर रूप न्याहाळत हे खाण्याची मजाही कुछ औंरच..! घाटातल्या रस्त्याच्या कडेला 'पीडब्ल्यूडी'ने रस्ता रुंद करीत बाजूला ठिकठिकाणी पर्यटकांना बसण्यासाठी, डोंगरदऱ्याचा आनंद घेण्यासाठी सुरेख, कलात्मक दृष्टीचा वापर करीत छान व्यवस्था केली आहे.
ज्यांनी कोणी ही सुविधा केली असेल किंवा ज्यांना ही कल्पना सुचली असेल त्यांना मनापासुन सॅल्युट.! असाच एक छान, निसर्गाने नटलेला, उंच डोंगर, दऱ्यानी सुंदर सजलेला छोटासा परिसर आहे. तो म्हणजे नगर - औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीच्या पुलाजवळील इमामपुर घाट..!
तशी पांढरीच्या पुलाजवळील भेळ प्रसिद्ध. घाट ओलांडल्यानंतर या रस्त्यावरून चाललेला माणूस इथे भेळ, चहाचा आनंद घेतल्याशिवाय पुढें जात नाही. हा घाट तसा फार मोठा नाही. माळशेज घाटाइतका नक्कीच नाही. परंतु घाटाच्या परिसरातील निसर्ग, डोंगर, सुंदर दरी तुम्हाला प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाहीत.
म्हणूनच 'पीडब्ल्यूडी'ने आपल्या कल्पकतेने तिथेही माळशेज घाटाच्या धर्तीवर रस्त्याच्या कडेला बसण्याची, उंच उंच डोंगर पाहत वातावरणाचा आनंद घेण्याची व्यवस्था केल्यास घाटाचे सौंदर्य अधिक वाढेल.
खरेतर या रस्त्यावरून ये जा करणारे प्रवासी इथे चहा, नाष्टा करण्यासाठी घटकाभर थांबतातच. इथल्या परिसरातील निसर्गाचे सौंदर्य तुम्हाला आकर्षित केल्याशिवाय राहणार नाही. निसर्गाने भरभरून दिलेल्या या परिसरात पर्यटकांसाठी, प्रवाशांसाठी खासगी हॉटेल्सची सुविधा आहे.
पीडब्लूडी (सार्वजनिक बांधकाम) खात्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कलात्मक दृष्टीचा अवलंब करीत घाट परिसर सुशोभित केल्यास इथे पर्यटक पर्यटनाचा आनंद घेतील. हा परिसर म्हणजे एक सुंदर व्हॅली आहे.
सर्वांनाच हा परिसर आपल्या प्रेमात पाडत असतो. राज्य शासनाने, संबंधीत लोकप्रतिनीधिंनी या घाट व परिसराचा विकास केल्यास पर्यटकांसाठी एका सुंदर निसर्ग पर्यटन स्थळाची निश्चित भर पडेल हे नक्की.
कारण येथून पुढे नेवासे येथे संत ज्ञानेश्वर यांनी भारतीय संस्कृतीतील महान, अजरामर ग्रंथ ज्ञानेश्वरी ज्या खांबाला टेकून लिहिला त्या पैस खांबाचे जगातील एकमेव मंदीर आहे. अशा या पवित्र तीर्थ स्थळाचे दर्शन घेण्यासाठी भाविक, पर्यटक याच इमामपुर घाटातून जातात.
याच रस्त्यावर शनि शिंगणापूर, दत्त देवगड देवस्थान, एमआयडीसी, मांजरसुंबा डोंगर, अवघ्या ९० किलोमीटर अंतरावर असलेले ऐतिहासिक औरंगाबाद, नजिकचे ऐतिहासिक अहमदनगर, यामुळे हा रस्ता पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
पर्यटक या सर्व स्थळांना भेट देण्यासाठी आनंदाने एक किंवा दोन दिवसांच्या सहलीचे नियोजन करु शकतील. शासनाचा महसूल वाढेल. रोजगार निर्माण होईल. म्हणूनच शासनाच्या एमटीडीसीने येथील घाट परिसर विकास, सुशोभीकरणात गांभिर्याने लक्ष दिल्यास या प्रकल्पास नक्कीच गती मिळेल
- जयंत येलुलकर (रसिक ग्रुप, अहमदनगर)