अहमदनगर - देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शहर वकील संघटनेने जिल्हा न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते सर्व न्यायाधीश व वकिलांना तिरंगी झेंडे प्रदान केले. वकील संघाच्या बार रूममध्ये झालेल्या या कार्यक्रमात सुमारे १,५०० तिरंगा ध्वज देण्यात आले.
यावेळी प्रथम न्यायदंडाधिकारी सुनील गोसावी, जिल्हा न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर, विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष व सहाय्यक सरकारी वकील अनिल सरोदे, उपाध्यक्ष संदीप वांढेकर, सचिव स्वाती नगरकर, सहसचिव अमित सुरपुरिया, हे उपस्थित होते.
यावेळी महिला सहसचिव आरती गर्जे, कार्यकारणी सदस्य सागर जाधव व विक्रम शिंदे आदींसह सर्व न्यायिक अधिकारी व वकील वर्ग मोठ्या संख्यने उपस्थित होते. यावेळी न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी नशा मुक्त भारतासाठी सर्वांना शपथ दिली.
अनिल सरोदे म्हणाले, अनेक स्वातंत्रसैनिकांनी बलिदान दिले म्हणून आपण हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा करत आहोत. शहर वकील संघटनेला याचा आनंद होत आहे. सर्व वकील बंधुभगिनी न्याय प्रक्रियेत सहकार्य करीत आहेत.
न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा म्हणाले, शहर वकील संघाने सर्वांना झेंडे देवून खूप महत्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. सर्व न्यायाधीश व वकिलांच्या घरावर तिरंगा ध्वज फडकला आहे. वकील व न्यायिक अधिकारी यांच्यात चांगला सुसंवाद असल्याने नगरचे लोक न्यायालय यशस्वी होत आहेत. न्यायालयातील सर्व वकिलांनी कायम अशीच एकता ठेवावी, असे आवाहन केले.