सिनामाई.
तु माझ्या गावची नदी आहेस..
जणु देवी..
तुझा उगम इथूनच जवळ..
गौरव आमचा..
शेकडो वर्षांचा तुझा वाहता प्रवास..
क्षीण झालीस तर नाहीस ना...
की इथल्या मातीतला
सुगंध लोप पावत चाललाय..
तुझा खळाळता प्रवाह..
तुझं मोठं पात्र..
तुझ्या हक्काचं..
तु वाहतेस या शहरातून..तु पवित्र, तु मंगल..का हात आखडता घेतलास..तुझं पूर्वीचं देखणेपण..तुझ्या पाण्यातली निर्मळता..दिसत नाही हल्ली..
की आमच्यातीलच कोणी
तुझ्या घरावर मारतोय दंश..
आम्हाला ही समजू लागलं आता...
माती सारून सारून तुला
अपंग बनवायचं त्यांचं कारस्थान ...
करतंय आमचंच कोणी..
पण सिनामाई...तु या लोकांसाठीनको ना रागावूस आमच्यावर...तु वाहत रहा..निखळ पाण्याच्या प्रवाहाने...
जसा पुर्वी जीव लावायचीस
या शहरावर..
पुन्हा एकदा प्रगट हो..
तेव्हा सारखीच...
आशीर्वाद दे भरभरून...
समृध्द कर पुन्हा या मातीला...मोहवून टाक त्याचा सुगंध..साऱ्या आसमंतात...ती फुटकी माणसेआमची आहेतही अन् नाहीतही...लुटू दे किती लुटायचं त्यांना...भरेल घडा त्यांचाही...
पण तु मात्र कोपू नकोस..
कर सुजलाम सुफलाम या गावाला..
गाव तुझंच आहे...
तुझंच असु दे ....!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)