श्रावण येतो मन झिम्माड होतं..
बाईंचं मन माहेरात जाऊन पोहचते.
लहानपणी आजीमां कथा सांगत,
'देव महादेव येतो धरणीवर'
श्रावणाचा गं त्याचा
सासुरवाडीत होतो पाहुणचार
श्रावण महिन्यात म्हणे शिवशंभो पृथ्वीवर रहायला येतात. या लोककथांनी मन रमून जातं. ती जिथे जन्मते, वाढते, बागडते, तिथेच पाहुणी होते. सासरची होते, पण एक हळवा कोपरा माहेराने व्यापून टाकलेलाच असतो...
माहेर आणि पंचमी यांचं जणु जिवाभावाचं सख्यं. लोककथा आणि ओव्या याही भारतीय स्त्रीचं मन सांगणाऱ्या.. ओवी म्हणजे ओवणे, गुंफणे. जात्यावर पहाटे दळताना, सडासंमार्जन करताना आपल्या भावना, वेदना आपल्या बोली भाषेत ओवल्या जात आणि ह्या ओव्या गायल्या जात.
मौखिक परंपरेची अमोल संपत्ती जणू आपल्यासाठी मागच्या पिढीने ठेवली आहे. माहेर म्हणजे स्त्रीच्या जिव्हाळ्याची जागा. घर सासरचं ऐश्वर्य कुबेराचं, पर माझं माहेर खोपटात.. लई लई मायेचं, सासर खूप श्रीमंत आहे, पण माहेरच्या मायेची सर कशानं यावी.?
पिता गेले स्वर्गी...माय झुरते मायेनंबंधू पुसतो मला..दुसरं काय नको...!
आता माहेरात तिचे बाबा नाहीत, मायपण झुरतेय.. पण ती म्हणतेय.. अशात भाऊ विचारतो हे काय कमी आहे का.? यातच तिला समाधान आहे. मायनं दादाला पाठवलय तिला पंचमीसाठी आणायला.
बंधू माझा मुराळी आलाकरीन गोडधोड..रातभर बुंदी पाडीन...बंधूसाटनं माझ्या...!!
भाऊ न्यायला आलाय, गोडधोड करीन. मग रात्रभर बुंदी छाटायला लागली तरी चालेल...
माहेरात लागते निवांत झोप
एका रातीचं सुख
मला सरगाहुनी त्याचं मोल.
तिला दुसरं कांही नको, एका रात्रीचं माहेर तिला मिळाल तरी संतुष्ट आहे. भाऊ काही बोलला तरी ती आपल्या मनाला सांगते..
भाऊबहिणीचं भांडण तिथं
कशाला रागरोस...!
बंधूला ओवाळायला भाऊबीजेच
एकच दिस...!
पंचमीला भाऊ तिला माहेराला न्यायला येतो. सोबत तिचा तिला चंद्रासारखा वाटणारा भाचाही आहे बरं...!
माझा भाऊ आला आज,माझा भाचा आला...लईच दिस झाले,आत्या चल माहेराला
तिचं मन पावसातल्या मोरासारखं थुई थुई नाचतं. उचंबळून येतं, भाऊ भाचा आग्रहाने बोलवतात. ही भरुन पावते.
भाऊ माझा इंद्रावाणीवहिनी हाय इंद्राणीभाकरतुकडा टाकतेओवाळूनी म्हणतेदिवाणसा आला किती दिसांनी
भावाचा मोठा अभिमान. साक्षात देवांचा राजा इंद्र, वहिनी इंद्राणी वाटते तिला भावजयही जिव्हाळ्याची आहे. तिला मायेनं विचारते दिवाणसाहेब किती दिवसांनी तुमचं येण झालयं. पाहुणचार होतो. तिची अपेक्षा फार नसतेच.
म्हणतात ना.. सासरच्या लुगड्याला माहेरची चोळी हवी. माहेरच्या घरात ज्योत जागती हवी. फक्त माहेरचं घर दिव्यांनी उजळून जायला हवं. शिंप्यालाही ताकीद देते...
शिंपीदादा,
तुझे दुकानी उच्च खण खडा
तु सांगूनी किंमती नको घालू
आमच्या नाती खोडा
उगाच महाग खण देऊन माझ्या भावाला फसवू नको बाबा. तेवढ्यानं आमच्या नात्यातं खोडा. व्यत्यय यायला नको हं.. कधीकधी तिच मन हलकसं खट्टू होतं. माहेरचा सांगावा आला नाही की माहेरात कुणी विचारलं नाही की तिला वाटतं,
लिंबाच्या लिंबोळ्या
लिंबाखाली पसरल्या
पोटी आल्या लेकी,
बंधू बहिणी न भाची इसरला
आता पूर्वीसारखी हौसमौज होत नाही माहेरात आल्यावर. तसं असलं तरी भाचीचा मत्सर करत नाही ती. उलट जाताना भावाला सांगते...
भाची माझी, लेक तुझी चांदणी
जावायी मिळावा तुला
तालेवार चंद्रावाणी
आपली लेक चांदणीसारखी, नक्षत्रासारखी आहे. तिला तसच तालेवार घराणं मिळू देत. असं तिचं माहेरपण होतं. मग ती सासरी नव्या उमेदीने उत्साहाने येते. आणि दिवाळीच्या भाऊबीजेची वाट पहात संसारात रमून जाते.!
आणि मी....
हाती नाही ग सयांनो
माझ्या जाते
तरी बी सयांनो
ही स्वप्नजा ओवी गाते
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)