कान्हा, तुझी किती रुप. विश्वरुपात तु, कालीया मर्दनात तु, राधेच्या डोळ्यात तु, मीरेच्या अभंगात, आईच्या अंगाईत तु, माझ्या मनातला बुध्दीवंत तु, गीतेसारखी ज्ञानगाथा देणारा तु,मोरपीसासारखा तलम विविध रंग उलगडून दाखवणारा, देवकीला, यशोदेला पुत्र म्हणून अभिमान असणारा..
सर्वमान्य असणाऱ्या इंद्रपुजेला आव्हान देऊन निसर्गाची पूजा करणारा, त्याचे महत्त्व जाणणारा, पशुपालनाचे महत्व पटवून देणारा, जुलमी राज्यव्यवस्थेला उलथून टाकणारा तु क्रांतिकारीच होतास.
द्वारकेला व्यापारी पेठ बनविलेस तेव्हा वैश्याचे पूर्णरुप वाटलास, गीतेची निर्मिती करताना पूर्ण रुपातील ज्ञानी पंडीत होतास. पांडवांना सत्यासाठी विजय मिळवून देताना क्षत्रियाचे पूर्णरुप असतोस.
गुराखी बनून श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देताना जणू श्रमिकाचे पूर्णरुप असतोस. गरीब पेंद्या, सुदामा, गोपगोपिकांबरोबर शिदोरीचा गोपाळकाला खाऊन समता शिकवणारा. जिवलग मित्रत्वाचे पूर्णरुप असतोस.
कुब्जेकडून चंदनलेप घेणारा तुच नारे कान्हा.? मोठी असलेली प्राणप्रिय राधेची अन् तुझी अशरीरी अमर प्रेम कथा तुझीच. फक्त तुझीच ना रे कान्हा.? याज्ञसेनीला कुठल्याही नात्यात न बांधता सखी मानून स्त्रीपुरुषांचं मैत्र सुरु करणारा तुच कान्हा.
नरकासुराचा वध करताना पत्नी सत्यभामेला सारथ्य देऊन समानता सुरु करणारा तुच कान्हा. बंदीगृहातून सोळा सहस्त्र स्त्रियांना सोडवून स्त्री मुक्तीचा पाठ देणारा तुच कान्हा.
सोळाव्या वर्षी न्यायासाठी सख्ख्या मामाचा वध करणारा तुच क्रांतिकारी कान्हा. सत्य, न्याय करताना सगासोयरा पाहू नका, असा कर्मयोग अर्जुनाला शिकवणारा तुच कान्हा.
तुझ तत्वज्ञान आजच्या काळातही योग्य आहे. पण आमचं एक चुकलयच कान्हा.. तू एक न्यायनिष्ठ, पराक्रमी, सहृदय माणूसपण जपणारा राजा होतास हे विसरुन आम्ही तुझी मंदिर उभी करत गेलो.
फक्त गोपींची चेष्टा करणारा, राधेवर प्रेम करणारा, दहीहंडी खेळणारा, असा तू कान्हा, अशी तुझी प्रतिमा बनत गेली अन् आम्ही तुझी पूजा करत गेलो. खरतर कान्हा गरज आहे तुझ्या तत्वांना आचरणात आणायची.
स्त्रियांना तुझ्यासारखा सखा हवाय. समानता देणारा पती हवाय. जन्म न देणाऱ्या मातेला यशोदामैय्या म्हणून अमर करणारा पुत्र हवाय. न्यायासाठी लढायला बळ देणारा मार्गदर्शक हवाय.
कान्हा तुझे अगणित पैलु दाखवण्यासाठी महाभारत, हरिवंश, भागवत या ग्रंथाची निर्मिती झाली. तरी योगेश्वरा तुला लोक जाणून घेऊ शकले नाहीत. आंधळे भक्त होऊ नका, न्यायाने वागणारे माणूस व्हा, असा संदेश देणारा कान्हा तू माणूस म्हणून जगलास..!
उगाच दांभिकपणा केला नाहीस, आव तर मुळीच आणला नाहीस. म्हणून तर कौरवांचा नाश, पांडवाचा त्रास उघड्या डोळ्यांनी पाहिलास. यादववंश तुझ्यासमोर संपला तरी शांत राहिलास. एखाद्या माणसासारखा.!
पण या दांभिक माणसांना तुला माणूस म्हणून वाचायचचं नसतं. म्हणून आपल्या सोयीसाठी कान्हा तुला रासलिला, अनेक चमत्कारांच्या कथेत गुंफत रहातात. देव बनवत राहतात. खरतर आजच्या भारताला तुझी फार गरज आहे कान्हा.
तू जगाला सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान असणारी गीता दिलीस. राजकारणात कसे असावे याची 'कृष्णनीती' दिली. तुझे बहुरंगी व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यासाठी तुला जाणून घ्यावं लागतं. तुझं दिपस्तंभासारखं असणं नाकारुन चालणार नाही.
कान्हा तू थोडा थोडा उमजत गेलास, समजत गेलास म्हणून आयुष्याचे कांही चक्रव्युह भेदता येताहेत. म्हणून कान्हा तू प्रत्येकाच्या आयुष्यात असायला हवास. मग येतोस ना कान्हा..?
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)