आज जेष्ठ साहित्यिक, कवि, विचारवंत आदरणीय गुलजार यांचा जन्मदिन. मागच्या पंधरा ऑगस्टला माझ्या वाढदिवसाला वेदिकाने गुलजारसाहब यांचे 'त्रिवेणी' हे आदरणीय शांताताईंनी अनुवादित केलेले पुस्तक दिले..
गुलजारसाहब यांनी हे पुस्तक शांताताईंनाच अर्पण केले आहे. त्रिवेणीविषयी काय लिहावं..?
ज्याप्रमाणे गंगा आणि यमुना या इतिहासाच्या, भगवंतांच्या वास्तव्याच्या साक्षीदार नद्या वाहताना आपल्याला दिसतात, पण त्रिवेणी या नावाची पूर्तता होते ती सरस्वती या गुप्त नदीच्या नावाची जोडणी गंगा, यमुना या नावांबरोबर केल्यानंतरच!
अगदी त्याप्रमाणेच पहिल्या दोन ओळी अर्थपूर्ण होण्यासाठी, तिसऱ्या ओळीची साथ या त्रिवेणी काव्यप्रकारात आवश्यक, सार्थ ठरते.
गुलजार यांचा मनाला दिपवून प्रेरणा देणारा अतुलनीय परिचय वाचताना त्यांच्या योगदानाची उंची समजते. शांता शेळके यांच्यासाठी अर्पणपत्रिकेत गुलजार लिहितात,
आप सरस्वती की तरह मिली, और सरस्वती की तरह ही गुम हो गयी, ये त्रिवेणी आपही को अर्पित करता हूँ।
यावरून गुलजार यांचा कृतज्ञभाव दिसून येतो.
उडून जाताना पाखराने फक्त इतकेच पाहिले, किती तरी वेळ फांदी हात हलवत होती. निरोप घेण्यासाठी की पुन्हा बोलावण्यासाठी? तिसरी ओळ या त्रिवेणीत अर्थ पूर्णतः ओतून मनाला स्पर्श करते. जीवन मरणाबद्दल गुलजार म्हणतात,
काय ठाऊक कसा कुठून घाव घालील अचानक. मी तर या आयुष्यालाच घाबरतो फक्त! मरणाचे काय? ते तर एकदाच मारून टाकते!
गुलजार यांच्या त्रिवेणीतील सखोल अर्थ अचूक अनुवाद करून शेळके यांनी मराठी वाचकांच्या मनी भिडवला आहे. आजचा पेपर इतका भिजलेला कसा, उद्यापासून हा पेपरवाला बदलून टाका.. या वर्षी पाचशे गावे पुरात वाहून गेली' (पेपरातील बातमी). यावरून जीवनाची क्षणभंगुरता लक्षात येते.
झोपणे व उठणे याबद्दल गुलजार अतिशय मार्मिकपणे त्रिवेणी मांडतात, एखाद्या घासासारखी झोप गिळून टाकते मला, रेशमी पायमोजे अलगद निघावेत तशी.. आणि सकाळी वाटते थडग्यातून बाहेर पडतो आहे मी.
निवडणुकीच्या वास्तविकतेबद्दल गुलजार म्हणतात, गल्लीत सगळीकडे पत्रके वाटली जाताहेत.. आपली कत्तल करणाऱ्यांनाच निवडून द्या. जवळ येऊन ठेपली आहे निवडणूकींची अवघड घटका!
जीवनप्रवासाबद्दल गुलजार म्हणतात, साऱ्या प्रवासात माझी जाणीव असते माझ्याबरोबर. परत फिरावेसे वाटते पण प्रवृत्ती होते पुढे जाण्याची. रस्ते पावलात रस्सीसारखे गुरफटत राहतात.
शांततेत विचार कानात गूंज आरव करतात, तर गोंगाटात काही स्पष्ट ऐकू येत नाही, हे अतिशय खुबीने गुलजार मांडतात. चला ना बसू या गोंगाटातच जिथे काही ऐकायला येत नाही. या शांततेत तर विचारही कानात सारखे आवाज करतात. हे कंटाळवाणे पुरातन एकाकीपण सतत बडबडत असते!
कवी गुलजार यांच्या सर्जनशीलतेने सजवलेल्या या त्रिवेणी काव्य आकृतिबंधास व शांता शेळके यांच्या अनुवादनाच्या स्पृहणीय कौशल्यास सलाम...!!
गुलजारजींचे हे शब्द माझ्या खूप आवडीचे. ज्याला आपल्या पदाचा, श्रीमंतीचा खूप गर्व होतो ना तेव्हा हे जरुर लक्षात ठेवावं..
बहुत गुरुर था छत को
छत होने पर
एक मंजिल और बनी
छत फर्श बन गयी...!
गुलजारसाहब जनमदिनकी ढेर सारी बधाईयाँ..!
- स्वप्नजाराजे (कोल्हापूर)