अंबाजोगाई (बीड) - एकल पालक असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी बाल संगोपन योजना कार्यरत आहे. मात्र या योजनेंतर्गत जिल्ह्यानुसार संख्येची मर्यादा न ठेवता सरसकट प्रत्येक कुटूंबाला त्याचा लाभ मिळावा, अशी मागणी आधार माणुसकीचा वतीने करण्यात आली आहे.
या योजनेसाठी दरवर्षी अर्ज भरण्याचा नियम रद्द करून लाभधारक मुलांचे १८ वय पूर्ण होईपर्यंत कसलाही अर्ज न भरता त्याला योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी आधार माणूसकीच्या उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी शुक्रवारी (दि. १९) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली.
राज्यपाल कोश्यारी यांचा शुक्रवारी येथे दौरा झाला. त्यानिमित्त विश्रामगृहावर ॲड. पवार व त्यांच्या उपक्रमातील विधवा महिलांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केली. यावेळी या महिलांनी राज्यपालांना राख्याही बांधल्या.
बाल संगोपन योजनेंतर्गत यावर्षी फक्त कोरोनामुळे निधन झालेल्या कुटुंबातील मुलांनाच याचा लाभ दिला. परंतू ही योजना एकल पालक असलेल्या कुटुंबातील सर्वासाठी आहे. प्रत्येक जिल्ह्याला याची संख्याही मर्यादित आहे.
ही संख्येची मर्यादा न ठेवता एकल पालक असलेल्या सरसकट प्रत्येक कुटूंबाला याचा लाभ द्यावा, दरवर्षी त्यासाठी अर्ज भरण्याची अट असू नये, त्या कुटुंबाला लाभ मिळत राहावा अशी मागणी निवेदनात केली आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी - राज्यात अनेक शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. त्यामुळे या शेतकऱ्यांचे कुटूंब उघड्यावर पडली आहेत. अशा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला शासनाच्या सर्व योजनांचा सरसकट लाभ द्यावा.
त्यात घरकुल, स्वच्छतागृह, कृषी योजना, मुलांना शिष्यवृत्ती, नोकरीत सवलत, महिलांना उद्योगासाठी वित्तीय सहाय्य, स्वयंरोजगार अशा विविध योजनांचा लाभ द्यावा, अशी स्वतंत्र मागणीही संत गाडगेबाबा सेवा भावी संस्थेंतर्गत आधार माणुसकीतर्फे करण्यात आली.
आधार माणुसकीच्या उपक्रमाने केलेल्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून हे प्रश्न निश्चित मार्गी लावू असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आधार माणुसकीच्या शिष्टमंडळाला दिले.