तुम्हाला भेटलंय का असं 'प्राजक्ताचं झाड' कधी ?

'जगी सर्व सुखी असा कोण आहे,
विचारे मना-तुचि शोधूनी पाहे.' असं रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे खरंच जगात असा कोण आहे, की जो खरंच सुखी आहे. तर शोधून सापडणार नाही. आपल्या अवतीभवती अनेक प्रकारच्या खूप समस्या आहेत.

खरंतर मग काय कमावले काय गमावले यापेक्षा आपल्याकडे काय आहे, काय करू शकतो, हे महत्त्वाचे नाही का.? जीवनमार्गाच्या या वाटेवर खूप खाचखळगे असणार आहेत, कधी काट्या-कुट्याची वाट तुडवावी लागणार तर कधी वेडीवाकडी वळणे पार करावी लागतील.

तेंव्हा या आयुष्याच्या प्रवासाला पूर्ण ताकदीनिशी सामोरं जावं लागणार, हे सत्य. अगदी झोपडीतला असो, बंगल्यातला असो किंवा आलिशान महालात राहणारा असो.. सर्वांना असा अनुभव येतंच असतो.

आयुष्यात कधी काही घटना अशा घडतात की होत्याचे नव्हते होऊन जाते.  आणि मग माणूस उन्मळून पडतो. पण अशा वेळी आपले माता-पिता, शिक्षक, गुरू अथवा नातेवाईक, मित्र-मैत्रीण यांनी आपल्याला एक ताकद दिलेली असते. जी आपलं मानसिक, भावनिक, शारीरिक अथवा आत्मिक बळ वाढवते.

आणि आपल्या प्रवासाला बळ देऊन काटे-कुटे, खाच -खळगे तुडविताना हिम्मत देण्यास मदत करते. आपल्या जगण्याची राख होताना जगण्यासाठी उमेद देणारे हे आप्तेष्ट, मित्र परिवार, परिचित-अपरिचित भेटतात. पाठीवर हात ठेवून लढ म्हणतात.

फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेण्यास मदत करतात. आशेचा नवा किरण दाखवितात. अगदी मनाचा दाह असह्य झाल्यावर 'फायर ब्रिगेड' बनतात. थंडगार शब्दसरींनी शांत करतात. 

भलेही काहीजण आपल्याला यश मिळाल्यावर आनंद न होता मागे नावं ठेवण्याचं काम इमाने इतबारे करतात. काहीजण विंचवासारखा डंख मारतात, तर काहीजण निवडुंगाची फांदी बनतात...?

परंतु काही माणसे भेटतात, तेंव्हा असे म्हणावेसे वाटते की, तुम्ही आयुष्यातील अशी जागा आहात, जिथे हातात माझ्या नेहमी फुलेंच आली. माझी ओंजळ छान सुगंधित फुलांनी भरून गेली.

खरंच जगण्याच्या या प्रवासात वाट मागे टाकतांना सदभाग्यामुळे काही माणसे 'माणूस' म्हणून भेटतात. श्रावणातील प्राजक्ताचं रूप घेऊन आपल्यासमोर येतात. त्यांच्या सहवासात येणाऱ्यांसाठी  ती सदैव बहरलेली असतात.

आणि त्या फिकट पिवळ्या रंगाच्या पाकळ्यांची, नारंगी देठांची नाजूक अशी फुलं अंगावर पडतात. सुगंधित अत्तराच्या हळुवार लाटांची बरसात करतात.

कोणत्याही क्षेत्रात आयुष्याची वाट कितीही खडतर असली ना, तरी तेंव्हा अशा प्राजक्ताची भेट व्हावी आणि तन-मन, अंतर्मय शीतल सुगंधाने भारून, भारावून जावे. माझ्या आयुष्यातील अशा प्रत्येक प्राजक्ताची मी ऋणी राहील.

मग अशा प्राजक्ताचं झाड आपल्या आयुष्यात भेटावं किंवा आपणच कोणासाठी तरी प्राजक्ताचं झाड बनावं. तुम्ही असा प्राजक्त बनलात का कधी...?

- छाया रसाळ (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !