महानगर.
गगनचुंबी इमारती...
लोकल, रस्ते, समुद्र किनारे..
माणसांच्या गर्दीत जिवंत वाटावे..
गर्दी मना मनांची...
विचारांची, काळजीची,
भविष्याची, स्वप्नांची...
जगण्याच्या आशेची..
एकमेकांच्या विश्वासाची...
हा समुद्र जवळचा.मन मोकळं करायचं...!काहीं सांगायचं, बोलायचं..एकटक क्षितिजाकडे पहात बसायचं...
लाट...
पायांना तिचा ओला स्पर्श...
नको काळजी करुस...
आहे ना मी...
सावरायला तुला...
तुझ्या साऱ्या प्रश्नांना ओंजळीत घे...सोडून दे माझ्याजवळ...तुझ्या भाव भावनांना ओळखतो मी...सोबत करतोच ना मी नेहमी...तू जिंकतो रोज...हो रोजच...
कामावरून घरी येताना..
लोकलच्या गर्दीतून वाट काढताना...
रुमालाने चेहऱ्यावरचा घाम पुसून काढत..
थकलेला असतोस...
दाराची कडी वाजवताना...
विसरून जातोसतुझा गर्दीत दुखावलेला हात...बाळाला कुशीत घेताना...फुलून जातोस...रोज जिंकतोस..राजा आहेस...महानगरीचा चेहरा आहेस...!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)