या जगात काही लोक नुसते म्हणायला 'जिवंत' असतात. 'मी', 'माझं', या पलिकडे जगात काय चाललंय, याकडे त्याचं लक्षच नसतं. ते काम करतात, खातात, पितात, नेहमीच्या सणा समारंभात भाग घेतात. पण जगत अजिबात नाहीत.
यांत्रिकपणे साऱ्या गोष्टी करत असतात. खरंतर प्रत्येक दिवस त्याच्याबरोबर घेऊन येत असलेले अनेक जादुभरे क्षण ह्या लोकांना कधीच दिसत नाहीत. जीवन या महान चमत्कारावर एक क्षणही विचारही करत नाहीत.
आपला पुढचा क्षण कदाचित शेवटचा क्षण असेल, याचं यांना भानही नसतं. मल्हारचं खळखळून हसणं, कश्वीचे निरागस प्रश्नं, सकाळी उठल्या उठल्या झाडांच्या पानावरचं दव पाहून मोत्यांचा आठव येतो. आकाशातील रंगाच्या विविध छटा पाहून मन मोहून जातं.
इंद्रधनुष्य पाहिलं की अजूनही छोट्या बाळांप्रमाणे आनंद होतो. कोऱ्या पुस्तकाचा वास घेतल्यावर ज्याचं मन भरुन येतं. पहिल्या पावसाच्या मृदगंधाने जो वेडा होतो, तो जिवंत आहे, असं म्हणायला काही हरकत नाही.
आनंदाच्या या हळुवार क्षणांच्या प्रत्येकाच्या व्याख्या अर्थातच वेगळ्या असतील मंडळी. स्वप्नजा म्हणतेय म्हणून नाही बरं. पण मला हातात ब्रश, रंग असले की ते जगणं वाटतं. धुवांधार कोसळणाऱ्या पावसात पन्हाळ्याच्या दिशेने रस्त्याच्या कडेने त्या भिजणाऱ्या ऊसाच्या मळ्यांना, झाडांना पहाताना मन रंगून जातं.
मला हिवाळा आवडतो. पण पावसाळ्यातील गाडीतून किशोरच्या गाण्याच्या साथीने केलेला हा प्रवास मनाला नवी उर्जा देतो. लग्नसमारंभात खूप दिवसांनी भेटलेल्या नातेवाईकांच्या बरोबर त्या स्पीकरच्या गोंधळात मोठमोठ्यानं बोलायची मज्जा काय औरच..
बरं ते घरी आल्यावर डोकं दुखत खरं..! पण तो भेटीचा आनंद कशात मोजायचा ? मैत्रिणीच्या बरोबरच्या चहापार्ट्या, स्नेहमेळावे, सुखदुःखाची वाटणी.. हे आनंद कशाला मोजायचे..?
ही आनंद मोजण्याची परिमाणं आपण शोधायचीच नाहीत. आपण या छोट्या छोट्या गोष्टीत रंगून जायचं अन् स्वतःलाच सांगत रहायचं बरं. की मी जिवंत आहे.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)