रोजच्या जगण्यात असे खूप सारे क्षण येत असतात आपल्या वाट्याला..

आनंद. स्वतःचा, कुटुंबाचा, समाजाचा. कितीतरी पदर आहेत ना या आनंदाचे. सुखाचे हास्याचे. परवा मुलाला नोकरी मिळाली.. चांगल्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कौतुक झालं..

अनेक वर्षांपासूनची मागणी असलेला परिसरातील रस्ता एकदाचा तयार झाला.. भाच्याच लग्न ठरलं.. मित्राला मुलगा झाला.. त्याने पार्टी दिली. वाढदिवस. लग्नाची एनीव्हर्सरी. आवडीचं जेवण. घरी पाहुण्यांचे आगमन.

कधी सत्कार... पाठीवर थाप.. परदेशातून आलेला मुलाचा फोन.. लकी ड्रॉ मधे नंबर आला.. परीक्षेत फर्स्ट क्लास.. भक्तांच्या गर्दीत सिद्धी विनायकाचं दर्शन झालं.. लॉटरी लागली.. कंपनीत इन्करीमेंट मिळालं..

हॉस्पिटलमधून ठणठणीत बरा होऊन घरी आला.. शेजारच्या सतीशचं लग्न ठरलं.. रेल्वेचं सीट कन्फर्म झालं.. कुणी घर बांधलं... वास्तुशांती.. अशा एक नाही.. अनेक घटनांत प्रसन्न होत असतो.. आपण सारे.

काही आनंद चंदेरी... काही सोनेरी, तर काही रोजच्या जगण्यात सहज मिळालेले.. चेहऱ्यावर फुललेलं आनंदाचं हास्य सारखंच.. सुख मोजता येत नाही, की त्याची कॅटेगरीही ठरवता येत नाही..

स्टेशनवर प्लॅटफॉर्म वर खेळणारा झोपडपट्टीतला छोटा मुलगा कुणी वेफर्सचा पुडा दिल्यावर किती आनंदून गेला.. त्या क्षणाचं त्याचं जगातलं सर्वात मोठं सुख तेच.

सुखाचे, आनंदाच्या क्षणांचे पदर उलगडताना.. आनंद कुठेही दडलेला असु देत.. तो एकच असतो. चेहरा खुलतो आपोआप.. कुणी विमानात बसू दे.. सिग्नलच्या खांबाला टेकून कुणी मर्सिडीज कारचं स्वप्न पाहू दे...

नाहीतर झाडावरील गाभुळी चिंच एका दगडात खाली पाडण्याचा आनंद तेव्हढाच हजार पट असतो.. आपलं सुखं कशात आहे हे महत्वाचं... रोजच्या जगण्यात असे खूप सारे क्षण येत असतात आपल्या वाट्याला...

मित्रांसोबत चहा घेणं... कट्ट्यावर बसून मनसोक्त गप्पा मारणं.. आवडीच्या ठिकाणी भटकंती करणं.. असे खूप सारे आनंद देणारे क्षण येतं असतात आपल्या वाट्याला.. अगदी सहज.

पहाटे प्रसन्न वातावरणात फिरायला बाहेर पडलो असताना.. मनात विचार आला, काही महिन्यांपूर्वी करोना संसर्गाने कितीतरी दिवस आपल्याला घरातून बाहेर पडणं देखील मुश्कील झालं होतं..

घरातल्या खिडकीत बसून आकाश न्याहाळताना स्वच्छंद विहार करणारे पक्षी नजरेस पडायचे.. केवढा आनंद घेत असतील हे सारे पक्षी...! रस्त्यावर नजर जायची.. सन्नाटा जाणवायचा.. एकटा पडलेला रस्ता.. अन् खिडकीतून त्याकडे पाहणारा मी.

वाटायचं एक चक्कर तरी मारावी रस्त्यावरून.. चहा तरी घ्यावा टपरीवर बसून.. गप्पा तरी माराव्या.. किती आनंद वेचता येतील.. खरंच.. आपल्या रोजच्या रस्त्यावरून फेरफटका मारायला जाणे हे देखील सुखाच असतं.

जेव्हा सहजपणे हे सारं मिळत असतं तेव्हा लक्षात येत नाही आपल्याला यातल्या आनंदाचं गमक. सकाळी झाडावरील सुगंधी फुलं अंगणात पडतात. तेव्हा ते वेचायचं भान आपल्याला हवं.

ते समजायला हवं.. नाहीतर झाडं गदागदा हलवून फुलं गोळा करायची सवय आहेच आपली. खिडकीत बसून एकटक त्या शांत रस्त्याकडे पाहणारा मी. आता रोजच जातो या रस्त्यावरून.

त्या दिवसांची आजच्या दिवसासोबत जेव्हा तुलना करतो.. तेव्हा हे क्षण नक्कीच आनंदाच्या प्रदेशात घेऊन जातं असतात मला...!

- जयंत येलुलकर (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !