नुकताच पाऊस पडला. थंड, आल्हाददायक वातावरण घरातून बाहेर पडायला साद घालीत होतं. मूड बनला की भुईकोट किल्ल्याकडे फेरफटका मारावा, असा विचार करीत नगर क्लब रस्त्याकडे मित्र सुदर्शन सोबत बाहेर पडलो..
येथील रस्ता.. सारा कॅन्टोन्मेंट परिसर हिरवागार, स्वच्छ. जणु कोणत्यातरी पर्यटन स्थळी आलोय.. असा भास व्हावा, इतका सुंदर. जवळच दिसत असलेला किल्ला. आसपास असलेली झाडी. शांत रस्ते. रस्त्याच्या बाजूला जागोजागी सिमेंट बेंच.
पावसाळी ओल्या वातावरणाच्या प्रेमात पडावं. या परिसरात सकाळी मोर देखील असतात. किल्ल्यावर, बुरुजावर भेटतात आपल्याला. सुंदर करतात सारा परिसर. सुख देत असतात आपल्या डोळ्यांना. मोकळ्या, थोडी भुरभुर असलेल्या रम्य वातावरणात गप्पा साजेशा होणारच नकळत.
लहानपणी पाऊस पडल्यावर रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साचायचं. हल्लीही असतंच. पण, पूर्वी रस्त्यांवर खड्ड्यात साचलेलं पाणी बालपणाची पर्वणी असायची. वहीतलं पान फाडत कागदाची घडी करून त्याची होडी बनविण्याची काय मजा होती..
हे बालपणात गढून गेलेले डोळेच सांगू शकतील. होडी पाण्यात सोडताना जो आनंद व्हायचा तो काही औरच. विमान आकाशात भिरकावतानाचा आनंद.. होडीचा पाण्यातून चाललेला विहार.. या साऱ्यांनी बालपण जगवलं आमचं....!
आज ते दिवस आठवले. गरीब, श्रीमंत असं कधी मनालाही न शिवणारं आमचं बालपण...! होडी फिरायची. आनंद वाढवायची. कधी कागदी विमान उडवायचो. आकाशाला कवेत घ्यायचो... बालपणातलं साम्राज्य असायचं ते.
कोणाचं विमान उंच जाऊन आलं..? ही गंमत सूख देत असायची. उडण्याची स्पर्धा होती. त्यात ईर्षा, कटुता कधी नसायची. हे सगळं आता केव्हाच विरून गेलंय. ती होडी. कागदाचं विमानं लयाला गेलं. एका बाजूला रस्त्यांवर साचलेलं पाणी पाहिलं.. अन् बालपण आठवलं.
आता ते जग पहायला मिळणार नाही. पावसाच्या पाण्यात चिमुकल्या हातांनी बनवलेली एखादी होडी पुन्हा फिरायला लागेल. मुलं पुन्हा माझ्याभोवती बसून धमाल करतील ही अंधुकशी आशा पाण्याला वाटत तर नसेल ना.?
- जयंत येलुलकर (अहमदनगर)