अहमदनगर - येथील सचिन दरवडे याने दिग्दर्शित केलेल्या 'बर्डस्केरर' या ऍनिमेशन लघुपटाला इंटरनॅशनल ऍनिमेटेड फिल्म असोसिएशनकडून गौरवण्यात आले आहे. इंटरनॅशनल ऍनिमेटेड फिल्म असोसिएशन ही जगातील पहिली आणि प्रतिष्ठित ऍनिमेशनची संस्था आहे.
या संस्थेने २००२ सालापासून २८ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन दिवस साजरा करण्यास मान्यता सुद्धा मिळवून दिली आहे. अहमदनगरमध्ये तयार झालेला 'बर्डस्केरर' हा पहिला स्टॉप मोशन ऍनिमेटेड लघुपट आहे.
'स्टॉप मोशन'मध्ये फिल्म तयार करताना प्रथम स्टुडिओत सेट तयार केला जातो. त्यानंतर कथेतील पात्रांचे पपेटस् तयार करून त्यांना हातांनी हलवले जाते. प्रत्येक हालचाल कॅमेरात टिपून फोटोज घेतले जातात.
ते सर्व फोटोज सलग जोडून चलचित्राचा आभास निर्माण केला जातो. ही अत्यंत अवघड आणि संयमतेने करण्याची प्रक्रिया आहे. सात मिनिटांचा हा लघुपट बनवण्यासाठी सचिन आणि त्याच्या टिमला तब्बल दोन महिने लागले.
या फिल्मचे छायाचित्रण अक्षय देशपांडे, स्टोरी बोर्डिंग सुशांत धनवडे, कला दिग्दर्शन सुदर्शन दरवडे, कार्यकारी निर्माता पुष्कर वैकर, संगीत दिग्दर्शन सुयोग मरलेचा, साऊंड डिझाईन विक्रांत ढवळीकर आणि विक्रांत पवार, व्हीएफएक्स पेंट अतुल पवार व दुर्गेश निसळ, प्रसाद गोसावी आणि प्रज्योत देशमुख यांनी सहकार्य केले.
या शॉर्ट फिल्मची निर्मिती साहेबराव दरवडे आणि छाया दरवडे यांनी केली. याआधी या लघुपटाची वेगवेगळ्या चार आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड झालेली आहे. या लघुपटाच्या मिळणाऱ्या यशामुळे 'बर्डस्केरर'च्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.