दूर क्षितिजावरून तांडव करीत,
तर कधी हळुवार येणाऱ्या लाटा..
जणु लाटांचं विश्व...
उसळत.. नाचत.. वाजत.. गाजत येत
किनाऱ्यावर समर्पित व्हायचं..
त्यांचं साम्राज्य... त्यांची दुनिया...
काही अलवार... स्वतःशी गुणगुणत..
खडकांवर झोकून देताना..
जणु अस्तित्वाला शरण द्यावं...
अन् विरून जावे स्वतःत...
तू धीरगंभीर..
साऱ्या लाटांना आपल्या कवेत घेत...
तुषार अंगावर येऊ देत,
खोलवर..
अंतर्मन भिजवून..
मनाच्या गाभाऱ्यात घेऊन येतेस एक लाट..
असेल नातं जन्मांतरीचं..
भाव विश्व जपायचं..
उसळून ये पुन्हा पुन्हा..
न्हावू घाल माझ्या भावनांना..
रिता होतोय की ओंजळीत घेऊन जातोय...?
सारं मोकळं आकाश...!
काही क्षण...
तू आठवतेस ..
भिजलेल्या,थरथरल्या क्षणांनी अलगद मिठीत घ्यावं तेव्हा...
एक लाट.. पुन्हा पुन्हा...
ओळखीची वाटावी...!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)