अहमदनगर - आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने अहमदनगर जिल्हा परिषदेच्या व पंचायत समित्यांची अंतिम गट -गण रचना जाहीर केली आहे.
जिल्हा परिषदेच्या ८५ गटांची तर पंचायत समित्यांच्या १७० गणांची अंतिम रचना जाहीर करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील ५ गटांच्या रचनेत दुरुस्ती करून ही अंतिम रचना जाहीर करण्यात आली आहे.
दि. २ मे रोजी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गट -गणांच्या प्रारूप रचनेचा आराखडा जाहीर झालेला होता. त्यावर दि. ८ जून पर्यंत नागरिकांच्या हरकती व सूचना मांडण्यासाठी मुदत देण्यात आलेली होती.
एकूण ६५ हरकती व सूचना नोंदवण्यात आल्या होत्या. त्यानंतर सोमवारी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या ८५ गट व १७० गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या नगर तालुक्यातील देहरे, नागरदेवळे, दरेवाडी व कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे व कोळपेवाडी या गटांच्या दुरुस्तीसह अंतिम रचना जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे.
अंतिम प्रभाग रचना जाहीर होताच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त केलेले आहेत.
आगामी काही दिवसांत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय अस्थिर परिस्थिती असूनही या निवडणुकांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.