पुण्यनगरीत आलो आणि 'तिथे' नाही जायचं, याला काय अर्थ आहे..?

'मित्रासाठी वाट्टेल ते !', 'दोस्ता तुझ्यासाठी काही पण..', 'सगळं सोडीन पण ही दोस्ती तुटायची नाय', ही वाक्य म्हणजेच गाढ मैत्रीची खरी व्याख्या. पण ऐन वेळेला जेव्हा मित्र गायब होतात तेव्हा जी पंचाईत होते तेव्हा काय होतं, हे कोणाला सांगणार.? या ऐन वेळेला मित्र नेमके गेले कुठे हे कळूनही उपयोग नसतो. कारण ती वेळ तर निघून गेलेली असते. असाच एक किस्सा नुकताच पुण्यनगरीत घडला.

त्याचं झालं असं की, नगरमार्गे एका नवरदेवाचं वऱ्हाड पुण्यनगरीत आलं. या नवरदेवाचा मित्र परिवार मोठा आहे म्हणून सासरच्यांना मोठ्ठे कार्यालय बुक करावे लागले होतेे. लग्नसोहळाही थाटात होणार होता. नवरदेवानेही मित्रांच्या आग्रहाखातर 'डीजे'सह 'खाण्या-पिण्याची' सोय केलेली होती. त्यामुळे किमान पन्नास एक जिगरी यार त्याच्यासोबत लग्नसमारंभात आलेले होते.

मंगल कार्यालयात गेल्यानंतर नवरदेव लग्नसमारंभाचे विधी आणि त्याच्या तयारीच्या नादात अडकला. सजून धजून तयार झाला अन् मिरवायला निघाला. आता मित्रांची गरज होती. म्हणजे आपल्या दोस्ताच्या लग्नात आनंदून डीजेच्या तालावर थिरकण्यासाठी. पण नेमके यावेळीच एकही मित्र जवळपास दिसेना. त्याने एका कलवऱ्याला सांगून मित्रांना बोलाव म्हणून निरोप दिला.

पण मित्र जागेवर होते कुठे..? त्यांचे फोनही लागेनात. ज्यांचे लागले ते प्रत्त्युत्तर देईनात. एकही मित्र फोन उचलत नसल्याचा प्रतिनिरोप नवरदेवाकडे आला. त्याची चिडचिड सुरू झाली. हा डीजे मी लावला कोणासाठी.? आता काय मी एकटाच नाचू का.? म्हणत त्याचा त्रागा सुरू झाला. वेळ जात होती, नातेेवाईकही घाई करत होते.

नवरदेवाची पंचाईत झाली. अखेर नाईलाजाने त्याने थेट मंडप गाठला. अक्षदा पडल्या. विवाह सोहळा संपन्न झाला. अर्धा-पाऊण तास झाला अन् हळूहळू एकेक मित्र कार्यालयात नजरेस पडू लागला. नवरदेवाचा संताप आणखीनच अनावर झाला. स्टेजवर फोटो काढण्यासाठी एकेक जण जसजसा वर आला, तसं नवरदेवाने त्यांना नजरेनेच फैलावर घेण्यास सुरूवात केली.

न राहवून एका जिगरी दोस्तांना त्याने चांगलेच सुनावले. माझं लग्न सोडून इतकं कोणतं महत्वाचं काम पडलं होतं, असं त्याने विचारलं. त्यावर 'अरे बाबा पुण्यनगरीत आलो आणि मंगलमुर्तीचं दर्शन नाही घ्यायचं, याला काय अर्थ आहे..?', असं ताे म्हणाला. लग्नापेक्षा दर्शन इतकं महत्वाचं होतं का, नंतर नाही का जाता आलं.? म्हणत नवरदेव चिडलेलाच.

नंतर सगळे मित्र एकत्र जेवायला बसले. नवरदेवाच्या एका नातेवाईकाने त्यांना पाहून विचारलं. 'काय यार दोस्तांनो, नवरदेवाला एकटं सोडून कुठे गेले होते..?' त्यावर एक जण म्हणाला 'या देवाला सोडून इथल्या देवाला भेटायला गेलेलो'. दुसऱ्या मित्राने पुष्टी जोडली की, 'अरे देवाला नको म्हणू, 'देवी'ला म्हण.' त्यावर सगळेच मिश्किलपणे हसले.

तो नातेवाईक संभ्रमात पडला ही हे सगळे  नेमके गेले कुठे होते. त्याने वारंवार या मित्रांचा पिच्छा पुरवला. अन् अखेर सत्य समोर आलं. ते असं की, हे सगळे मित्र वऱ्हाडात पुण्यनगरीत आले. अन् नवरदेव अडकलाय, लग्नाला वेळ आहे असं समजून त्यांनी भाड्याच्या रिक्षा बोलावल्या. आम्हाला सगळ्यांना मंगलमूर्तीच्या दर्शनाला जायचंय असं सांगितलं.

रिक्षात बसून सगळे जण मंगलमूर्तीच्या मंदिरासमोर चौकात आले. मंदिराच्या बाहेरूनच हात जोडले अन् डावीकडच्या रस्त्याने 'त्या' पेठेत प्रवेश केला. आजवर ऐकलं होतं, पण आता त्यांना एकापेक्षा एक देखणी रुपं समोर दिसत होती. हा खुलासा ऐकून नातेवाईकाला काय समजायचं ते समजलं. 'पण हीच वेळ बरी सुचली तुम्हाला. मित्राला एकटं सोडून खुशाल तुम्ही...'

त्या नातेवाईकाला मध्येच अडवत एक जण म्हणाला, 'जाऊ द्या ना राव. एक तर कधी नव्हे ते पुण्यनगरीत आलो आम्ही. इथं यायचं आणि 'तिथे' नाही जायचं, याला काय अर्थ आहे..?' अखेर हे सगळे दोस्त लग्नसोहळा सोडून घाईघाईने कुठे गेले, याचा उलगडा त्या नातेवाईकाला झाला. अन् त्यानेही हात जोडून 'धन्य आहात तुम्ही' असं म्हटलं.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !