खरे देवदूत तर 'यांनाच' म्हणायला हवं..!

आपण कुणाच्या तरी प्रभावात येणं हा मानवी मनाचा स्थायी भाव आहे. 'हा' माणूस आहे ना, तो मोठ्या पक्षाचा पदाधिकारी आहे. लायकी नसताना मिरवायची खूप हौस. पैसा कमावला.. मात्र कधी कोणाचं भल केलं नसेल या माणसानं..?

पण पैसा...! समाजात आज हेच क्वालिफिकेशन आहे.. या माणसाला कधी कोणाचं भलं झालेलंही पाहवत नाही.. त्याचा चेहरा पडतो म्हणे, चांगलं काही ऐकल्यावर.. असं बरेच लोक म्हणतात..

काही माणसे असतात, त्यांना स्वताच्या व्यतिरिक्त कोणाचं कौतुक झालं तर त्याचा त्रास होतो. लोकं त्याच्या आदर करतात. दिसायला मनस्वी, पण आहे चतुरंगी. दुसऱ्याच्या हाताने साप मारण्याची सवय असलेला. कपट कारस्थानी. माणूस म्हणून तर वाईटच.

अशा लोकांच्या जवळ गेल्यावर लक्षात येत असतं आपल्याला हे सगळं. सार्वजनिक जीवनात अशीही काही माणसे भेटतं असतात आपल्याला. फोकस फक्त माझ्याकडे हवा. खरेतर सर्वांच्या सहकार्याने चांगले काही घडतं असेल तरी. फोकस माझ्याकडेच पाहिजे.

याचा फायदा माझ्याच करिअरला व्हायला हवा. लोकांनी माझ्यावरच फुलं उधळायला हवी. दिसायला विनम्र, मनस्वी वाटणारी अशी माणसे अशावेळी सारं काही विसरलेली असतात. काहीतर जगाचं, जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणारी माणसे कधीही इतरांसाठी रस्त्यावर येतं नाहीत.

अंगावर शिंतोडा पडायला नको. या बाबतीत खूप जागरूक असणारी ही माणसे माझा काही संबंध नाही. मला यात फारसा इंटरेस्ट नाही असं सांगतात पण याच गोष्टींचं अपडेट मात्र व्यवस्थित ठेवत असतात. तर रोजच्या जीवनात अशीही अनेक माणसे आपल्याला भेटतं असतात.

म्हणूनच आजच्या युगात जी माणसे वेळप्रसंगी स्वतःचा विचार न करता इतरांच्या हितासाठी धडपडत असतात. त्यांच्या भल्याचा विचार करतात. त्यांच्यासाठी आपला वेळ देत असतात. तीच आपल्यासाठी हिरो असायला हवी.

या लोकांनी जर हाच वेळ स्वताच्या हितासाठी दिला तर केव्हाच मोठं होण्याची ताकद त्यांच्यात असते. पण मग समाजात परिवर्तन कोण करणार..? अशी साधी, निर्व्याज माणसेच खऱ्या अर्थानं मोठी असतात. म्हणूनच पहिला सॅल्युट यांना हवा.

हल्ली गळा सोन्याने भरलेला अन् हाताशी आलिशान कार असेल तर तरुणांच्या मनात तो आयकॉन होतो. काळ बदलला आहे. तरीही, कढईत पूर्वीची खरवड अजून थोडी आहे. समाजासाठी काही तरी वेगळं, चांगलं काम करणाऱ्या माणसांच्या रुपाने ही खरवड अजून बाकी आहे.

ही माणसे समाजाच्या जिवंतपणाचं उदाहरणं आहेत. आजच्या समाज जीवनाचा हाच खरा श्वास आहे. यांना जपायला हवं. समाजात खूप उच्चभ्रू वर्गाची, सधन, घरंदाज माणसे असतात. इतकी समृद्ध आयुष्य असलेली काही माणसे साधेपणाने वावरतात.

समाजासाठी मनापासुन झटताना दिसतात. त्यांच्यात देव दिसत असतो आपल्याला. खरे देवदूत यांनाच म्हणायला हवं..! केवळ पैसा कमवायचा, दिवसभर त्याची आकडेमोड करणाऱ्या लोकांच्या हातून समाजाचं काहीही हित साधणार नसतं. आणि आपण मात्र यांच्या मागेपुढे करण्यात मश्गूल असतो..

- जयंत येलुलकर (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !