अहमदनगर - शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी खेळाकडे लक्ष केंद्रित करून आपल्या क्षेत्रामध्ये करिअर करावे. खेळाच्या माध्यमातून विविध करिअर करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी गुलमोहर स्पोर्ट्स क्लबने विविध खेळाडू घडविले आहेत. या खेळाडूच्या माध्यमातून देशपातळीवर नगर शहराचे नाव उज्वल केले जात आहे.
सावेडी उपनगरातील गुलमोहर स्पोर्ट्स क्लबची खेळाडू सुमेय्या आरिफ शेख या १७ वर्षीय क्रीडापटू गुवाहाटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड झाली आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून तिची निवड झाली आहे.
गुलमोहर स्पोर्टस क्लबच्या माध्यमातून देशाला उत्कृष्ट खेळाडू देण्याचा मानस आहे. या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचे फुटबॉल प्रशिक्षण दिले जाते. सुमेय्या शेख प्रमाणे अनेक खेळाडू क्लबने घडवले आहेत, अशी माहिती गुलमोहर स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष झोहेब खान यांनी दिली आहे.
या निवडीबद्दल उपाध्यक्ष डॉ. प्रताप पठारे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, सेक्रेटरी गॉडविन डिक, जॉईंट सेक्रेटरी गोपीचंद परदेशी यांच्यासह विविध स्तरातून सुमेय्या शेख हिचे अभिनंदन व कौतुक होत आहे. सुमैय्याला मुख्य प्रशिक्षक म्हणून प्रसाद पाटोळे, सुभाष कनोजिया, अक्षय नायडू यांचे मार्गदर्शन लाभले.