पिंपरी चिंचवड - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये सरचिटणीस (महिला) या महत्वाच्या पदावर जयश्री गाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी अजित पवार यांनी दीड तासाच्या भाषणात पिंपरी चिंचवड शहरातील विविध समस्यांचा आढावा घेतला. तसेच नूतन कार्यकारिणीला सूचना केल्या. विभागीय अध्यक्ष वैशाली नागवडे यांच्या हस्ते जयश्री गाडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
महिला या घर सांभाळून विविध सामाजिक व राजकीय कार्यक्रमात हिरीरीने भाग घेत असतात. त्यामुळे पुरुष कार्यकर्त्यांनी महिलांना सामाजिक कामात शक्य ती मदत करावी, असे आवाहन नागवडे यांनी यावेळी केले.
यावेळी सुमारे ५०० महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. नियुक्तीपत्र देताना अध्यक्ष आल्हाट, गव्हाणे आणि इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जयश्री गाडे या महिला व मुलींच्या विविध सामाजिक प्रश्नांसाठी गेली काही वर्ष पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत आहेत.
त्यांच्या सामाजिक कार्याची व राष्ट्रवादीतील कामाची दखल घेऊन राष्ट्रवादीने सरचिटणीस या महत्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती केली आहे. चिंचवड, मोशी, चिखली परिसरातील महिलांनी व सामाजिक संस्थांनी जयश्री गाडे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.