ब्युराे रिपोर्ट (MBP Live24) - अलीकडच्या काळात लोकांची जीवनशैली प्रचंड व्यस्त झाली आहे. या धकाधकीच्या काळात त्यांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही. आपल्या गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. पण स्वत:कडे लक्ष न दिल्यामुळे शरीर हळूहळू आजारांच्या टप्प्यात येते. हृदय कमकुवत होऊ लागते.
धकाधकीच्या व तणावाच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो. त्यासाठी सर्वात गरजेचे हे आहे की, व्यस्त व धावपळीच्या जीवनशैलीतून थोडा वेळ काढणे आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे. माणसाच्या बऱ्याच चुकीच्या सवयी हृदयरोगास कारणीभूत ठरतात.
पण जर चुकीच्या सवयींना सोडले आणि हृदयाला बळकट बनवले, तर हृदयविकाराचा झटका येण्याच्या संभवाला माणूस कमी करू शकतो. तसेच आणखीही काही गोष्टींच्या व सवयींमध्ये बदल करण्याची नितांत गरज आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हृदय बळकट करण्यासाठी धूम्रपान सोडणे गरजेचे आहे.
धूम्रपान करणे (सिगारेट ओढणे) आजकाल फॅशनच झाले आहे. लोक आरोग्याचा विचार न करता सिगारेट ओढण्याची सवय लावतात. ती नंतर त्यांच्यासाठी हानिकारक ठरते. सिगारेट ओढल्याने कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका वाढतो. म्हणून हृदय निरोगी ठेवण्यासाठी धूम्रपान करणे थांबवावे.
जास्त वजन असल्यामुळे हृदय विकाराचा धोका असतो. इतरही अनेक रोग शरीराला कवेत घेतात. त्यामुळे जर हृदयाला बळकट आणि निरोगी ठेवायचे असेल, तर कमी चरबी आणि कमी साखरयुक्त आहार घ्यावा. तसेच, जास्तीत जास्त फळे आणि भाज्या खाव्यात. शिवाय दररोज व्यायाम करावा.
अति प्रमाणात मद्यपान करणेही आरोग्यास अपायकारक असते. त्यामुळे उच्च रक्तदाब व हृदयाशी निगडित आजार होण्याची शक्यता असते. जास्त मद्यपान केल्याने हृदय कमकुवत होते. म्हणून हृदयाला ताकदवान ठेवायचे असेल, तर मद्यपान कमी करावे किंवा करूच नये.
पाण्याच्या अभावामुळे माणसाला अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची देखील शक्यता वाढते. म्हणून दररोज किमान दोन ते अडीच लीटर पाणी प्यावे. प्रत्येकाच्या वैयक्तिक गरजेनुसार दररोज किती पाणी प्यावे ही वैद्यकीय सल्ल्यानुसारही ठरवावे.