अहमदनगर - जिल्ह्यात १० जुलै रोजी 'बकरी ईद व देवयानी आषाढी एकादशी' हे सण साजरे होणार आहेत. त्यादृष्टीने, जिल्ह्यात कोणत्याही किरकोळ घटनेवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, किंबहुना तशी परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी पोलिसांना मदत व्हावी, म्हणून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे अनुषंगाने कर्तव्य बजावताना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा दंडाधिकारी यांनी संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत २८ जून रात्री १२ वा पासून ते ११ जुलै, २०२२ रोजी २४-०० वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या प्रतिबंधात्मक आदेशामुळे नमूद केलेल्या कालावधीत कोणाही इसमास शस्त्रे, काठया, सोटे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठ्या किंवा शारिरीक इजा करणेसाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधने जवळ बाळगण्यास मनाई आहे.
कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे. जाहीरपणे घोषणा देणे, ध्वनिवर्धक किंवा ध्वनीक्षेपक उपकरणसंच वापरणे किंवा वाजवणे, सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल किंवा शातता धोक्यात येईल असे कृत्य करणे, यास मनाई आहे.
आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सौंग आणणे अगर तशी चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे. सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारासाठी किंवा अन्य कारणास्तव सभा मिरवणुका काढणेस व ५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे.