राजकारण ही किती उथळ झालं आहे.. "राजकारण" हा विषय आला की आपण या शब्दांची खिल्ली उडवत असतो. सामान्य माणसासाठी हा प्रांत म्हणजे घृणा वाटते असा.
पण हेच राजकारण.. याच्याशी संबंधीत असणारी माणसे अर्थात नेते अर्थात पुढारी... आपल्या जीवनाशी कितीतरी निगडित असतात.. तुमच्या आयुष्यातील, जगण्यातील खूप सारा काळ आपल्या घराच्या चार भिंतीच्या बाहेर जात असतो..
आणि हे बाहेरचं जीवन सुखकर व्हावं की खडतर, याचे सारे लगाम तुम्ही रहात असलेल्या भागाच्या राजकीय पुढाऱ्यांच्या हातात असतात. हा पुढारी उर्फ नेता विकासाची दृष्टी असलेला, विचारी, अभ्यासू असेल, त्याला स्वताच्या कर्तव्याची, जबाबदारीची जाणीव असेल, शहराविषयी प्रेम असेल, तर आपलं शहर सुंदर, हवं हवसं, विकसित व्हायला वेळ लागत नाही..
शहरात वावरताना इथले रस्ते, बागा, गटारी, दिवे, फुटपाथ, सभागृहे असं चांगलं काही पहायला मिळालं की आपण नक्कीच सुखावून जातो...! जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते.. जगणं सुंदर वाटू लागतं..
आपल्या शहरावर भरभरुन प्रेम करायला लागतो मग आपण. चांगल काही करण्याची ऊर्जा मिळत असते आपल्याला यातून. संस्काराची जडण घडण होते. अन् एक छान, सुखकर जीवन व्यतीत होत असतं आपलं.!
म्हणूनच या क्षेत्राकडे निदान आपल्या जगण्यासाठी अतिशय गांभीर्याने पाहायला हवं आपण.. अन् याच्या उलट घडलं तर, तुम्ही येता जाता शहराची स्थिती पाहून लाखोली वाहत असता आपल्याच जन्मभूमीला, कर्मभूमीला...
इथले खड्ड्यांचे रस्ते, वाहत्या गटारी इ. शहराचं विदारक चित्र पाहिल्यावर तुम्ही दुःखी होता.. जगण्याचा, जीवनात काहीं चांगलं करण्याचा उत्साह क्षीण होतो तुमचा. परंतु हे सारं बदलण्याची ताकद तुमच्या आमच्यातच असते..!
पण जेव्हा ही वेळ येते, तेव्हा हे चित्र बदलण्याची कुवत असणाऱ्या सन्माननीय मतदारांना आपल्या पक्षाचा, जातीचा, गल्लीतला, ओळखीचा किंवा एखाद्या खाजगी गोष्टीत डोक्यावर हात..! असं सारं आठवतं असतं.
आणि बहुतांशी मतदार स्वताच्या पवित्र मतदानाचा सौदा करून एखादी, दुसरी हिरवी नोट हातात पडण्यासाठी रांगेत उभे असतात. काहीं उच्चभ्रू वर्गाला तर या मतदानाचा आणि आपला काही संबंध आहे असं कधी वाटतच नाही.
आणि मग आपल्याला येतात विदारक, मन विषण्ण करणारे अनुभव. राजकारणात आपल्याकडे विचारी, अभ्यासू माणसे बोटावर मोजण्याइतकी आहेत. त्यांना सलाम..!
पण ज्यांचा जनतेच्या प्रश्र्नांशी कधी संबंध आला नाही असे तुमच्या अंगावर नोटा फेकून तुमचं मत हिसकावून घेणारे दलाल.. ज्यांनी राजकारणाची व्याख्या बदलली. प्रतिष्ठा धुळीस मिळवली..
अन् आपण साजुक तुपासारखे, आपला तर याचा काही संबंधच नाही अशा आविर्भावात असतो. काहीं मोजक्या लोकांनाच त्यांच्या पक्षाची ध्येय धोरणे माहीत असतील. बाकीचे...
वर्षावर्षाला गळ्यात कसा वेगवेगळा पंचा बदलायचा यात माहीर.. ज्यांना साधं जन गण मन म्हणता येत नाही.. ते शहराच्या नव्हे तर देशाच्या विकासावर जेव्हा चर्चा करतात तेव्हा या सगळ्या तमाशासाठी आपणच जबाबदार आहोत हे प्रकर्षानं जाणवतं राहतं..!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)