अहमदनगर - कोरोना महामारीचा फटका सिनेरसिकांनाही बसला होता. न्यू आर्टस कॉलेजातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन वर्षे बंद हाेता. पण तब्बल सव्वादोन वर्षांनंतर हा महोत्सव आजपासून पुन्हा आयोजित केला जात आहे.
दि. १० मेपासून सलग चार दिवस दुर्मिळ चित्रपट व लघुपट पाहण्याची संधी नगरकरांना मिळणार आहे. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये दरवर्षी हा चित्रपट महोत्सव आयोजित केला जातो.
यंदा या महोत्सवाचे पंधरावे वर्ष आहे. दुर्मिळ चित्रपटांसह लघुपट व माहितीपट स्पर्धाही आयोजित केली असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक अभिजित गजभिये यांनी दिली आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध नाट्य व चित्रपट अभिनेते कैलास वाघमारे यांच्या हस्ते होणार आहे. हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून प्रेक्षकांना प्रवेशिका संज्ञापन अभ्यास विभागात मोफत उपलब्ध आहेत. सिनेरसिकांनी या चित्रपट महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन उपप्राचार्य आठरे व विभाग प्रमुख प्रा. संदीप गिर्हे यांनी केले आहे.
या महोत्सवात दरवर्षी वेगवेगळ्या थीमवर आधारित सिनेमे दाखविले जातात. यंदाची थीम नेचर (निसर्ग) आहे. यामध्ये चिल्ड्रन ऑफ मॅन, द सोशल डिलेमा, बिफोर द फ्लड, लाइफ ऑन अवर प्लॅनेट, मार्च ऑफ पेंग्विन्स, आईस एज, आदी चित्रपट दाखवले जातील.
तर दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'मुंबई मेरी जान' हा सिनेमाही या महोत्सवात दाखवला जाईल. सिनेमानंतर होणारी चर्चा MBP Live24 च्या फेसबुक पेजवर लाईव्ह दाखवली जाईल.