स्वतःशीच विचार करा.. कधी कधी प्रश्न पडतो की आपल्याला एखादे यश किंवा सुखं मिळाल्यावर इतर लोकांचा विश्वास का नाही बसत? कां बरे सलते त्यांना दुसऱ्याचे भले झालेले ?
आपण अगदी मोकळ्या मनाने त्यांच्याशी आपला आनंद शेअर करायला जातो, पण त्या बदल्यात वाट्याला काय येतं? फक्त आश्चर्यकारक प्रश्न. “अरे बापरे,हे तुला मिळूच कसे शकते?”, अशी आणि अनेक प्रश्नार्थक वाक्यं !!! मग अनेक प्रश्न मनात गोंधळ करून जातात.
खरंच आपल्या नशिबी ते यश किंवा तो आनंद चुकून आला कां? आपल्याला अधिकार नाहीका ते उपभोगायचा..? आपण त्याच्या योग्यतेचेच नव्हतो कां? स्वतःलाच असा कितीवेळा दोष द्यायचा..?
त्यांच्या चष्म्यातून आपण स्वतःचीच पारख करायची आणि आत्म-घातकी वृत्तीप्रमाणे स्वतःच कोसत रडत बसायचं. नाही नं सोसत दुसऱ्यांनी आपल्या अस्तित्वावर बोट ठेवलेले? मग या अश्रुंचे रुपांतर स्वाभिमानात करायला शिकले पाहिजे.
बोलणाऱ्यांच्या तोंडावर चपराक बसेल असे यशस्वी क्षण पुन्हा एकदा आणि वारंवार सिद्ध करा. त्यांच्या डोळ्यातली धुमसणारी आगच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊन जातील. तेव्हा खरी जाणीव होईल तुम्हाला 'सेल्फ एस्टीम' काय चीज असते ते !!
इथेच नाती उलगडतात.. जी सुखं-दु:खात साथ देतात तीच खरी माणसं.. बाकी सब झूठ.!
- दीपाली विजय माळी (अहमदनगर)