...तरच समतेचा सुर्य उगवेल आणि निरभ्र आकाश दिसेल

हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेला एक निर्णय... अवघ्या महाराष्ट्राला विचार करायला लावणारा आणि नव्या दिशेने  मार्गक्रमण करायला लावणारा ठरला. शेकडो वर्षापासून पतिनिधनानंतर स्त्रीला सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमात प्रवेश वर्ज्य असत असे.


पतीचे शव असताना तिला शेवटचा मळवट भरणे ही तर अत्यंत क्रुर प्रथा वाटते. सहचराच्या मृत्यूनंतर ती बाई अत्यंत दुःखात असते. आणि एखादी उत्साही की विकृत बाई उठून तिचा शेवटचा मळवट भरते... मध्ये एके ठिकाणी हे पाहून मला संतापाने रडायला येत होतं. त्यापेक्षा मी काहीच बोलू शकत नसल्याने स्वतःला हतबल असल्याची भावना होत होती.

तिचे कूंकू पुसणे, बांगड्या फोडणे, म्हणजे तिचा शृंगाराचा जन्मजात हक्क हिरावून घेणे. स्त्री लहानपणापासून कूंकू लावते, बांगड्या घालते. मग पतिनिधनानंतर हे सारं बंद करायला लावणं कुठल्या धर्मग्रंथात लिहिले आहे ? पतीपेक्षा पत्नी वयाने लहान असते. पण तिने सारा त्याग करायचा. कारण ती स्त्री आहे म्हणून...!

शिवछत्रपतींनी आपल्या मातेला सती जाऊ दिले नाही. येसुबाई राणीसाहेबांना स्वराज्याची कुलमुखत्यार करुन न्यायदानाचा अधिकार दिला. स्वराज्याच्या पहिल्या स्त्री न्यायाधीश दिपाआऊ बांदल तर निस्पृह न्यायदानात प्रसिध्द होत्याच. पण रणांगणावर त्यांनी अनेकदा पराक्रम गाजवला आहे. 

ताराराणीसाहेब, सकवारबाईसाहेब, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई या विरांगनांनी पतिनिधनानंतर आपल्या पराक्रमाने अवघ्या जगाला दिपवून टाकले होते. या अशा प्रथा पाळण्यात आपल्या महिला भगिनी आघाडीवर असतात. हे महिलाजातीचे दुर्दैवच नाही का ?

असं ओरबाडून मंगळसुत्र काढणे, कूंकू पुसणे किती क्रुरपणाचे आहे, हे त्या महिलांना कळत नसावे का ? आम्ही हे कार्य आमच्या परीने करत असतोच. पण मुळात स्त्रियांनी यावर विचार करुन यावर ठामपणे मत मांडलं पाहिजे. काही घरी सुशिक्षित महिलासुध्दा लेकीसुनांना बांगड्या घातल्या नाहीत, मोठं कूंकू लावलं नाही, म्हणून टोमणे मारताना दिसतात.

स्त्री प्रथम माणूस आहे. तिला तिची स्वतःची मतं आहेत. त्यानुसार तिलाच काय शृंगार करायचा ते ठरवू देना..! तथाकथित समाजरक्षकाचे बुरखे पांघरलेल्या मागास विचारांच्या लोकांची मानसिकता बदलणं खूपच महत्त्वाचे आहे. त्यापेक्षा हा बदल घडणे अतिआवश्यक आहे. आता सुप्रिया सुळे, निलम गोऱ्हे या महिला प्रतिनिधींनी याविषयीचे विधेयक मांडण्याचा प्रस्ताव मंत्रीमहोदया यशोमती ठाकूर यांच्यासमोर ठेवला आहे. ही चळवळ आपणही आपल्या परीने पुढे नेऊया.

मंगळसुत्र हे पती असल्याचे एक चिन्ह आहे. म्हणून पती असलेल्या महिलेच्या नावाच्या आधी सौभाग्यवती लिहायची पध्दत आहे. नवरा प्रचंड मानसिक छळ करु देत. मारहाण करु देत, संसार करताना नियम अटी यांचा स्त्रीसमोर डोंगर उभा करु देत.. मग ती कसली सौभाग्यवती ? यासारखा दुर्दैवी विनोद तिच्या आयुष्याचा कुठला असेल ? असा नवरा असतानाही त्याच्या नावाचं मंगळसुत्र घालणं हीसुध्दा त्या बिचारीला शिक्षाच असते.

मंगळसुत्र एक दागिना म्हणूनच त्याकडे पहावं. हवं असेल तर तिने ते घालावं अथवा घालू नये, एवढं तरी स्वातंत्र्य तिला हवंच. कारण स्त्रीसाठी समाजाने प्रतिष्ठेच्या ज्या उतरंड्या लावल्या आहेत त्या म्हणजे - प्रथम क्रमांकावर येते ती फक्त एक, दोन, तीन मुलगे असलेली स्त्री. दुसऱ्या क्रमांकावर एक मुलगा आणि एक मुलगी असलेली स्त्री. तिसऱ्या क्रमांकावर  फक्त मुली असलेली स्त्री.

चौथ्या क्रमांकावर संतान नसलेली स्त्री. पांचव्या क्रमांकावर घटस्फोटिता. सहाव्या क्रमांकावर परित्यक्ता (नवऱ्याने सासरच्या लोकांनी टाकून दिलेली). सातव्या क्रमांकावर जरठ कुमारिका. आठव्या क्रमांकावर  शरीरविक्रय करुन उदरनिर्वाह करणारी वेश्या...!

चौथ्या क्रमांकापासूनच्या महिलांना सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमात अपमानित केले जाते. मला स्वतःला दोन्ही मुली असल्याने एका ओटीभरणात गरोदर महिलेची ओटी भरु देण्यात आली नव्हती. अत्यंत संताप आणि अपमानित होऊन तो कार्यक्रम अर्धवट सोडून मी तिथून बाहेर पडले होते. ज्यांनी माझा अपमान केला ते जवळचेच होते.

बाईला कळलं पाहिजे आपण पुरुषसत्ताक पध्दतीच्या वाहक आहोत. महिलांना टाचेखाली ठेवण्यासाठी पुरुषसत्ताक पध्दतीने असे मनगढंत कायदे, परंपरा, कर्मकांड काढले आहेत. म्हणूनच सख्यांनो आपण एक होऊन अशा चुकीचा परंपराना तिलांजली देऊया. आपल्या मुलांना मुलींचा सन्मान करायला शिकवूया. मगच समतेचा सुर्य उगवेल आणि आपल्या लेकीसुनांना विहरायला निरभ्र आकाश मिळेल. मग करुया ना त्यांच्या पंखात बळ द्यायचं काम. शुभास्ते पंथान संतु...!

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !