अहमदनगर - दलित हत्याकांड म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील तिहेरी हत्याकांडाच्या खटल्याचे कामकाज पूर्ण झाले आहे. एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृणपणे हत्या झाल्यामुळे हे प्रकारण देशभरात गाजले होते. पोलिस तपासात मात्र हे दलित हत्याकांड नसून चुलतभावंडांनीच या तिघा जणांची हत्या केल्याचे समोर आले होते. दि. २४ मे रोजी जिल्हा सत्र न्यायालय या हत्याकांडाच्या निकालावर फैसला सुनावणार आहे.
काय होते तिहेरी हत्याकांडाचे प्रकरण ?
दि. २१ ऑक्टोबर २०१४ रोजी जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथे संजय जगन्नाथ जाधव, जयश्री संजय जाधव व सुनील संजय जाधव या एकाच दलित कुटुंबातील तीन जणांची निर्घृणपणे हत्या झाली होती. संजय पती, जयश्री त्यांची पत्नी व तर सुनील त्यांचा मुलगा होते. याप्रकरणी संजय जाधव यांचा पुतण्या प्रशांत दिलीप जाधव याने पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.
जाधव कुटुंबियांच्या वतीने दावा केलेला होता की, हे तिहेरी हत्याकांड जवखेडे खालसा गावातील उच्चवर्णीय लोकांनी घडवून आणले. त्यामुळे गुन्ह्यात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक अधिनियमाचे कलमे वाढवण्यात आली होती.
असा केला हत्याकांडाच्या गुन्ह्याचा तपास
एकाच दलित कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याने संपूर्ण राज्य ढवळून निघाले होते. या प्रकरणात गृहमंत्रालयाने विशेष लक्ष घातले. पोलिस प्रशासनाने विशेष पथकामार्फत आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला. गुन्ह्याची व्याप्ती पाहून तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. तब्बल दीड महिना ते घटनास्थळ व पाथर्डी येथे तळ ठोकून होते.
या पथकाने या तिहेरी हत्याकांडचा कसून तपास केला. तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम व अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका निभावली. संशयित व काही स्थानिक नागरिकांचे नार्को व इतर मानसशास्त्रीय चाचण्या केल्यानंतर मयत जाधव कुटुंबीयांच्या घरातीलच प्रशांत दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव आणि दिलीप जगन्नाथ जाधव यांनी खून केल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे या गुन्ह्यात आरोपी प्रशांत दिलीप जाधव याला दि. ३ डिसेंबर २०१४ रोजी, अशोक दिलीप जाधव याला दि. ७ डिसेंबर २०१४ रोजी व दिलीप जाधव याला दिनांक १८ डिसेंबर २०१४ रोजी अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्यात महाराष्ट्र शासनाने मुंबईतील ख्यातनाम फौजदारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली.
असे चालले खटल्याचे कामकाज
या खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे एकूण ५४ साक्षीदार तपासण्यात आले. महत्वाचे साक्षीपुरावे व आरोपींची मनोवैज्ञानिक चाचणी केली होती. त्यासंबंधीचे निष्कर्ष या सर्व एकंदरीत पुराव्याचा विचार करता तिन्ही आरोपींना दोषी ठरविले जावे, अशी आग्रहाची मागणी ऍड. उमेशचंद्र यादव-पाटील यांनी केली होती.
सरकार आणि विरोधी पक्षाच्या वकिनांच्या दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी या प्रकरणाचा मंगळवार, दि. २४ मे रोजी अंतिम निकाल जाहीर करणार आहेत.