अहमदनगर - 'मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन' अशी भीमगर्जना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली होती. त्याची खिल्ली उडवण्याची एकही संधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात सोडत नाहीत. नगरमध्येही नुकताच पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला आहे.
किरण काळे युथ फाऊंडेशन व जिल्हा तालिम संघाच्या वतीने दोन दिवसीय छत्रपती शिवराय राज्यस्तरीय निमंत्रित कुस्ती स्पर्धा येथे घेण्यात आली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी सायंकाळी नगरच्या वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात पार पडला. यावेळी राज्याचे क्रीडामंत्री सुनिल केदार हेही आलेले होते. त्यावेळी थोरात यांनी कुस्तीच्या आखाड्यात चांगलीच राजकीय टोलेेबाजी केली.
बक्षीस वितरण सोहळ्याला राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार, आमदार सुधीर तांबे, लहू कानडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कुस्ती स्पर्धेत भाषण करताना महसूूलमंत्री बाळासाहेब थाेरात यांनी राजकीय टोलेबाजीची संधी सोडली नाही. मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, अशी गर्जना केली होती.
फडणवीस यांच्या गर्जनेची खिल्ली उडवताना महसूलमंत्री आपल्या भाषणात क्रीडामंत्री केदार यांच्याकडे पाहून म्हणाले की, 'या स्पर्धेला येण्याचे निमंत्रण आयोजकांनी तुम्हाला दिले होते. त्यानुसार आपण येण्याचे आश्वासन दिेले. पण आपण यावे म्हणून आयोजक पुन्हा पुन्हा आठवण करून देण्यासाठी तुम्हाला संपर्क करायचे. तुम्हीही परत परत मी येईन, असे आश्वासन देत होतात.
आमच्याकडे 'मी परत येईन, परत येईन' असं म्हणणारे परत येत नसतात, हे सगळ्यांंना माहित आहे. पण तुम्ही आयोजकांना दिेलेला शब्द पाळत खरेचंच इथे आलात, त्याबद्दल आपले धन्यवाद. या वाक्याला क्रीडारसिकांनी चांगलीच दाद दिली. व्यासपीठावरही हशा पिकला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या भारतीय जनता पार्टीचे नगर जिल्हा प्रभारी आहेत. त्यांच्यावर नगरची जबाबदारी आहे. महसूलमंत्री थोरात यांनी फडणवीस यांचे नाव घेतले नसले तरी त्यांची राजकीय फटकेबाजी कोणाला उद्देेशून होती, उपस्थितांना मात्र 'परफेक्ट' कळले.