सातारा - येथील औंध पोलिस ठाण्याचे लॉकअप तोडून गंभीर गुन्ह्यातील ५ कैद्यांनी पलायन केले आहे. या आरोपींच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना देखील मारहाण केली आहे. पलायन केलेल्या आरोपींमध्ये अहमदनगर येथील एका कुख्यात दरोडेखोराचा देखील समावेश आहे.
ही घटना खटाव तालुक्यातील औंध पोलिस ठाण्यात घडली. तुरुंगाचे दार तोडून दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यातील ५ आरोपी पहाटे पळून गेले. कालपासून महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे सध्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे सातारा येथेच आहेत.
औंध पोलिस ठाण्यातील पोलिसांनी या संशयित दरोडेखोरांना एका गुन्ह्यात अटक केली होती. हे सर्व संशयित पाच जण पोलिस कोठडीत होते. हे आरोपी बीड व अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.
त्यांची नावे सचिन भोसले, राहुल भोसले, अजय भोसले, अविनाश भोसले, होमराज भोसले अशी आहेत. या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे.
तसेच आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांची वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली आहेत. या आरोपींना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.