अहमदनगर - दलित हत्याकांड म्हणून देशभरात गाजलेल्या जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील तिहेरी हत्याकांडाच्या खटल्याचा निकाल लागला आहे. या हत्याकांडात आरोपी म्हणून सध्या कारागृहात असलेल्या तीनही आरोपींची जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. पोलिस प्रशासन व सरकार पक्षासाठी हा निकाल धक्कादायक मानला जात आहे.
या खटल्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. खटल्याचे कामकाज जवळपास पूर्ण झाले तेव्हापासून सर्वांना निकालाची उत्सुकता होती. एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृणपणे हत्या झाल्यामुळे हे प्रकारण देशभरात गाजले होते. पोलिस तपासात मात्र हे दलित हत्याकांड नसल्याचा निष्कर्ष समोर आला होता.
मृतांच्या चुलतभावंडांनीच हे हत्याकांड केल्याचे साक्षीपुरावे समोर आले होते. त्यामुळे या हत्याकांडाला आणखी वेगळी कलाटणी मिळाली. नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके, पोलिस अधीक्षक लखमी गौतम, अपर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी तपास केला.
विशेष म्हणजे तिन्ही आरोपींची नार्को चाचणी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आले होते. अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले. या खटल्यात राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उमेश्चंद्र यादव पाटील यांची नियुक्ती केली होती.
सरकार पक्षाने या खटल्यात ५४ साक्षीदार तपासले. अंतिम निकाल सुनावताना जिल्हा सत्र न्यायालयाने तीनही आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करत असल्याचा निकाल दिला. याबाबत सविस्तर निकालपत्र प्राप्त झालेले नाही. परंतु, तीनही आरोपींना सोडून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या खटल्यात राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उमेश्चंद्र यादव पाटील यांची नियुक्ती केली होती. सविस्तर निकालपत्र आल्यानंतर सरकार पक्षाच्या वतीने औरंगाबाद उच्च न्यायालयात या निकालाविरूद्ध अपिल केले जाईल, असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.