आपल्याच आतला तळ ढवळून काढणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं..?

पूर्वीपासून एक ऐकायला येतं. बायका मत्सरी असतात. खरंतर बाई असो वा पुरुष, दोघेही 'मत्सरी' असतात हे खरं.. बाईच्या चुकांचा बोभाटाच फार हो..! बाई बाईची शत्रू असते हे वाक्य तर अजूनही ऐकायला येत असतंच...

दोन मित्र एका ऑफीसमध्ये काम करत असतात. तिथे बढतीची संधी असेल. पुरुष आपल्या मित्राला मदत करतात. स्त्रीयांच्या बाबतीत हे घडेलच असं नाही. मग तुम्ही म्हणाल बायका मत्सरी असतात. तसंही नाही बरं.. कारण मत्सरग्रस्त पुरुषांच्या नावावर जास्त गुन्हे आहेत. असो.

हल्ली कोणाचं निर्मळ कौतुक करताना माणसं दिसत नाहीत. सतत 'एकमेकांकडे संशयाने पहायचे, विनाकारण जज करत रहायचं. कुठे बोटं ठेवून कमी लेखता येईल हे पहाणं. इतरांची मापे काढून, टिंगलटवाळी करुन ती चुकीची मत जास्तीत जास्त सार्वजनिक करण्यात माणसं आपला वेळ खर्ची घालवतात.

ही प्रवृत्ती सर्वांच्यातच कमीअधिक प्रमाणात असतेच. आपणही कुणासाठी तरी जजमेंटल असू शकतो. समोरच्याचे दहा चांगले गुण विसरुन त्याच्या व्यक्तिमत्त्वांतील एक छोटासा काळा डाग शोधण्याचं कसब लोकांच्यात वाढलंय हे खरं.!

यामुळे आपली मनःशांती घालवून बसतोय एवढं खरं. समोरची व्यक्ती आपल्या विचारांच्या, तत्वांच्या चौकटीत कदाचित बसतही नसेल. तिच्याविषयी पूर्वग्रहदूषित मत्सर असेल, ती आपल्यापेक्षा कांही गोष्टीत सरस असेल म्हणून तुम्हांला तिच्याबद्दल इर्षा वाटत असेल.

एखाद्या कट्टर विचारधारेला चिकटून बसायची तुमची सवय असेल. म्हणजे तुमच्यात परिपक्वतेचा अभाव आणि इतरांची टिका करणं, चिकित्सा करणं, हे तुमचं टोकाला गेलेलं मानसिक व्यसनही कारण तुम्हाला दुसऱ्यांविषयी जजमेंटल व्हायला उद्दुक्त करतच असतात.

आपण यासांठीच घडलेल्या गोष्टींची शहानिशा करावी. समोरच्या माणसांच्या वागणुकीबद्दल तात्काळ विश्लेषण, चर्चा, शेरे देण टाळावं. आपली मतं इतरांपर्यंत पसरवणं टाळावं. वास्तविक कुठल्याही माणसाच्या भेटीनंतर सबंधित माणसाबद्दल मत बनवणं, ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे.

पण आपल्या व्यक्तिमत्त्वांत खरंचच बदल घडवायचा असेल, तर आपल्या दृष्टीकोनातून बनलेलं मत समाजात पसरवणं कटाक्षाने टाळावं. हे तुम्ही सुसंकृत आहात याचचं द्योतक आहे. मत्सर वाटणं, ही मानवी सहजसुलभ भावना असली तरी त्यातून बाहेर पडणं महत्त्वाचे.

गढूळ पाणी पिल्याने पोट खराब होतं, निवळलेलं पाणी शरीराला उपकारक असतं. एखाद्याचे कौतुक करण्याकरता आपल्या आतला तळ ढवळून स्वच्छ करणे गरजेचे आहे. होय ना तुम्हांला काय वाटतं..?

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !