अहमदनगर - व्हीआरडीई चौकातील रविश कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेच्या घरी वारंवार येणाऱ्या संशयित व्यक्तीला नागरिकांनी पाठलाग करून पकडले. अन 'खरे' कारण समोर येताच त्याला बेदम चोपले. नंतर कोतवाली पोलिसांच्या हवाली केले.
हा प्रकार बुधवारी सकाळी घडला. रविश कॉलनीत राहात असलेल्या एका महिलेच्या घरी एक संशयित युवक वारंवार चकरा मारत होता. आधी तो घर भाड्याने मिळेल का, हे विचारण्यासाठी आला होता. मात्र रहिवासी यांनी त्याला नकार दिला.
दुसऱ्यांदा तो आपण एका खासगी बँकेतून आलो असल्याचे सांगत आला. तुमच्याकडे बँकेचे कर्ज आहे. आपण वसुलीसाठी आलो आहोत, असे त्याने सांगितले. अन अचानक घरात एकट्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळाला.
महिलेने तत्काळ घराबाहेर धाव घेतली. त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे शेजारी राहणारे नागरिक बाहेर आले. त्यातील काही जणांनी लगेचच पळत जाऊन पाठलाग करत रिक्षातून पळून जाणाऱ्या चोरास ईलाक्षी शोरूम जवळ पकडले.
त्याच्याकडे महिलेचे हिसकावून नेलेले दागिने सापडले. त्यामुळे कॉलनीतील नागरिकांनी त्यास चांगलाच चोप दिला. ही घटना समजताच कोतवाली पोलिस स्टेशनच्या पोलिस घटनास्थळी गेले. त्यांना संशयित युवकाला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकाकडे एका फायनान्स कंपनीच्या कर्जदारांची यादी सापडली आहे. त्याच्या मोबाईलवर सतत एका व्यक्तीचा फोन येत होता. नागरिकांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्यावर तो फोन कट करायचा.
कोतवाली पोलिस या युवकाची अधिक चौकशी करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे महिला वर्गात भीती निर्माण झाली आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना घरात घेऊच नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.