तुम्हाला प्रश्न पडला असेल ना स्वप्नजा आज तेजोवलय /ऑराविषयी काय लिहितेय..? असं म्हणतात की मानवी शरीर प्राणशक्तीने बनलेले आहे. या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी अनेक घडामोडी घडत असतात.
या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक उर्जा क्षेत्र सतत तयार होत असते. आपल्या शरीरालगत उर्जेच्या या वलयाला 'ऑरा किंवा तेजोवलय' असे म्हणतात. जे प्रत्येक सजीवाला असतेच.
'क्वान्टम फिजिक्स'नुसार शास्त्रज्ञांनी सिध्द केल्याप्रमाणे सगळं विश्व उर्जेने बनलेले आहे आणि त्या सिध्दांतानुसार निर्जिव वस्तूनांही वलय असते. त्या दिवशी पल्लवीची रांगोळी पाहून कविताताईला हेच सुचलं.
आज हे आठवण्याचे कारण म्हणजे एक मुलगी एके ठिकाणी म्हणत होती, "तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे.? मला नियम बियम सांगताहात..!" समोरची व्यक्ती तिला जरा रागानेच म्हणाली, "तुझ्याभोवती काय तुझ्या वडिलांच्या मोठेपणाचा ऑरा आहे का ? तो घेऊन फिरत जा. म्हणजे लोकांना कळेल, तु कोण आहेस.?"
हे असे लोक समाजात तुम्हांला जागोजागी भेटतील. मी पूर्वी एका जीममध्ये जात होते. तिथे नव्या शिक्षिका आल्या होत्या. त्या आल्या त्याच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट. शहरातील एका मोठ्या उद्योगापतींची सून सकाळी सकाळी जीममध्ये आली. या नव्या जीमशिक्षिकेने तिला अभिवादन केले नाही.
झालं. नवश्रीमंत बाईंचा पारा चढला. थेट जीम व्यवस्थापनाकडे तक्रार गेली. गरीब बिचाऱ्या बाईची नोकरी गेली. सासरे उद्योजक, नवरा उद्योजक. पण या बाईंच कर्तृत्व ते काय..? अशा या मोठेपणाचाच ऑरा सोबत घेऊन फिरणाऱ्या बायकाचं, पुरुषाचं काय करायचं.?
'स्वकर्तृत्व' नावाची गोष्ट कदाचित या लोकांना माहित नसावी. पतीनिधनानंतर किती जणींनी आपलं कुंटुंब नीट सांभाळलं आहे. आपलं झाकाळून गेलेलं व्यक्तिमत्व कष्टानं पुढे आणलंय.?
एका बॉसची बायको माझ्या मैत्रीणीला अक्षरशः राबवून घ्यायची. वर्षभरासाठीची चटणी, लोणचं, पापड हे सारं अगदी रितसर आर्डर सोडून करुन घ्यायची. हा नवरा, तिच्या नवऱ्याचा बॉस, यात या बाईचं कर्तृत्व ते काय..?
मध्ये पोलिस खात्यातील पोलिसांना घरी कसे वापरुन घेतात, या विषयावर वादळ उठलं होतं. सत्ता हातात असली की माज येत असतो. अन त्यातून दुसऱ्यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती जन्माला येत असावी.
तेव्हा एका पोलिसाने नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर असं सांगितले की 'आम्ही ट्रेनिंग पोलिसाचं घेतलं पण इथे साहेबांच्या मुलांची डायपर बदलणे, भाजी आणणे, मुलांना शाळेत सोडणे, अशी काम करतोय.'
म्हणून काही उच्चपदस्थ व्यक्ती निवृत्त झाल्या की त्यांना कुत्रसुध्दा विचारत नाही, अशी गत होते. त्यामुळेच आपण माणूस आहोत. समोरच्यांनाही माणूस म्हणूनच वागवायला हवं. नवी सून आल्यावरही घरात एक नवा नोकर कामाला माणूस मिळाला आहे, अशी वागणूक दिली जाते.
मी इतकी वर्ष केलं मग आता तुम्ही केलंच पाहिजे, असा एक सूर असतो. तो सोडून द्यायला हवा. मग म्हातारपणी त्याचं सुनेनं तुम्हांला सांभाळावं ही अपेक्षांच चुकीची ठरते नाही.
बॉस, सासू, सासरे, अधिकारी ही पद कायमसाठी नाहीत. आधी तुम्ही माणूस आहात. माणसासारखं वागा. अन मग बघा सभोवताली कसे माणसांचे मळे उभे राहतील. बघा पटतंय का, नाहीतर द्या सोडून. कारण यावरच तुम्ही तुमच्या अंतरंगात माणूसपण किती जपलंय हे दिसत असतं..!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)