इस्लामाबाद (वृत्तसंस्था) - पाकिस्तानात राजकारणाचा पारा चांगलाच तापला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी खुर्ची वाचवण्यासाठी केलेला सगळा आटापिटा व्यर्थ गेला आहे. शनिवारी मध्यरात्री १२.३२ वाजता पाकच्या संसदेत अविश्वास प्रस्तावावर मतदान झाले. तर १२.५८ वाजता इम्रान सरकार १७४-० मतांनी पडले.
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार रविवारी दुपारी संसदेची बैठक होत आहे. यावेळी शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून निवड होणार आहे.
त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी मध्यरात्री उशिरापर्यंत राष्ट्रीय संसदेचे कामकाज सुरू होते. विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्याची मागणी केली. सत्ताधारी पक्षाचे सर्व खासदार सभागृहाच्या बाहेर निघून गेले.
इम्रान खान यांनी तरीही आपले सरकार पाडण्यामागे कट असल्याचे सांगितले. आणि अमेरिकी वकिलातीचे एक पत्र सभापतींकडे सोपवले. मात्र, रात्री ११ वाजता सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टात दाखल झाले. तर संसदेत सभापती असद कैसर व उपसभापती कासिम सुरी यांनीही राजीनामे दिले.
एकीकडे संसदेचे कामकाज सुरू असताना बाहेर इम्रान खान यांचे समर्थक एकत्र आले होते. त्यामुळे लष्कराला देखील रस्त्यांवर यावे लागले. कैद्यांना घेऊन जाणारी वाहने आणली गेली. तसेच सर्व विमानतळांवर 'हाय अलर्ट' घोषित करण्यात आला.
आता पाकिस्तानातील कुठलाही नेता किंवा अधिकारी ना हरकत प्रमानपत्राशिवाय देश सोडून जाऊ शकणार नाही. एकंदरीत आणखी काही दिवस पाकिस्तानचे राजकारण असेच तापलेले राहिल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.
पाकिस्तानचे प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू इम्रान खान सन १९९१ मध्ये सामाजिक कार्यात उतरले होते. एप्रिल १९९६ मध्ये त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला. मात्र १९९७ मध्ये त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. सन २०१३ मध्ये त्यांच्या पक्षाने तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले.
सन २०१४ मध्ये इम्रान खान यांनी नवाज शरीफ सरकार विरोधात 'आझादी मार्च' काढला. तर दि. १८ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. दि. १० एप्रिल रोजी विश्वासमत ठराव हरल्यामुळे आता त्यांना पायउतार होण्याची वेळ आली.