अहमदनगर - सावेडी उपनगरातील सहकारनगर येथील बेलस्टार मायक्रो फायनान्सचे कार्यालय फोडून चोरी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या तोफखाना पोलिसांनी आवळल्या आहेत. या कार्यालयात चहा घेऊन येणाऱ्या व्यक्तीनेच चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.
तोफखाना पोलिसांनी मोठ्या कौशल्याने या गुन्ह्याचा तपास करून अशोक तुकाराम दळवी (रा. तुळजाभवानीनगर, एकविरा चौक, अहमदनगर) याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सावेडीतील सहकारनगरमधील बेलस्टार मायक्रो फायनान्सचे कार्यालय फोडून चोरट्यांनी सुमारे ८८ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली होती. याप्रकरणी नीलेश विष्णूृदास बैरागी (वय ४०, रा. श्रीरंगनगर, शेंडी बाह्यवळण रस्ता, ता. नगर) यांनी फिर्याद दिली होती.
त्यानुसार तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे व तोफखाना पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी भेट देऊन पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले होते.
फौजदार सोळंके हे आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत त्यांना जी माहिती मिळाली ती ऐकून तेही आश्चर्यचकित झाले. मात्र अशोक दळवी (वय ३३) याला ताब्यात घेत चौकशी केल्यावर खरी माहिती समोर आली.
अशोक हा फायनान्स कार्यालयामध्ये चहा वाटप करण्याचे काम करत असतो. त्यानेच हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्यानुसार फौजदार सोळंके, हवालदार दत्तात्रय जपे, संभाजी बडे, शैलेश गोमसाळे, सतीश त्रिभुवन, विशाल दिवटे यांनी दळवीला अटक केली.
या गुन्ह्यातील काही मुद्देमाल देखील तोफखाना पोलिसांनी हस्तगत केला आहे. दळवी याला न्यायालयासमोर हजर केले असता या गुन्ह्याच्या आणखी सखोल तपासासाठी त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.