मस्करीची कुस्करी. तुम्ही कुठल्या कॅटेगिरीत येता?

विनोद करणं चांगली गोष्ट आहे. हसणं याच्यासारखा दुसरा व्यायाम नाही, असं म्हणतात. पण सतत बायकांवरचे जोक वाचताना अक्षरशः डोक्यात जातात. पुरुष बायकांची टिंगलटवाळी करण्यात विकृत आनंद मानतात.

आईची बहिणीची कोणी टिंगलटवाळी केली की भडकणारे लोक मात्र बायकोच्या जाडीवरुन, स्वभावावरुन आपल्याच मित्रासमोर, भावासमोर टिंगलटवाळी करण्यात विकृत आनंद घेतात.

अर्थात बायकांवरचे जोक्स फॉरवर्ड करण्यात बायकाही आघाडीवर आहेत. कोणाच्याही शारारिक व्यंगावर, जाडीवर विनोद करणे हे कोणत्याचं निखळ विनोदनिर्मितीच्या साच्यात बसत नाही. प्रत्येक गोष्टींची आचारसंहिता असते तशी विनोदाचीही असते.

तुम्ही म्हणाल विनोद तर असतात तर हलक्यात घ्यावं... याने जोक्स केल्याचं दुःख असतंच, पण विकृतांचा काळ सोकावतो. अनेक विनोदवीर होऊन गेलेत, त्यांना समोरच्याला न दुखवता सुध्दा विनोदनिर्मिती करता येतेच. 

त्यासाठी खालच्या पातळीला उतरायची गरज नसतेच. यामुळे आपण नवीन पिढीला बायका आणि त्याचं शरीर, स्वभाव टिंगलटवाळी करण्यासाठीच आहे, असं नकळत शिक्षण देत असतो.

प्रत्येक वेळी बाईवरचा जोक फॉरवर्ड करताना स्वतःच्याच आईला, बहिणीला तिथे आठवा तुम्ही अशी फालतूगिरी परत करणार नाही. मागे मी लिहलेलं होतच..

आज पुन्हा हे आठवायचं कारण म्हणजे कालच्या ऑस्कर सोहळ्यातील सुत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीने (जरी तो स्क्रीप्टप्रमाणे वाचत असला तरी) विल स्मिथच्या बायकोवर असभ्य टिप्पणी केली. विल स्मिथला राग आवरला नाही. त्याने स्टेजवर जाऊन त्या सुत्रसंचालकाचे थोबाड फोडले.

खरं सांगू मीही त्याच्याजागी असते तर हेच केले असते. लोक अर्थातच स्मिथच्या विरुध्द बोलत आहेत. विनोदच तर होता लाईटली घ्यायचा ना, असं म्हणणारे लोक जेव्हा त्यांच्या फॅमिली मेंबरवर असा जोक केला असता तर त्यांची त्वरीत प्रतिक्रिया हीच असती...

पण म्हणतात ना 'पर दुःख शितल' या न्यायाने लोक दुसऱ्यांना शहाणपण शिकवायची संधी सोडत नाहीत. स्मिथच्या पत्नीचे आजारपणात केस गेलेत, तिला टक्कल झालय.. अशा स्थितीत तिची केलेली टिंगल स्मिथचं काय पण कुणालाच सहन झाली नसती.

स्त्रीयांच्या शरीरात हार्मोन्स इंबॅलन्स, बाळंतपण, मोनोपॉज अशी अनेक स्थितंतरे घडत असतात. म्हणून लग्नाआधी सडपातळ असणारी स्त्री एका बाळंतपणात आपली फिगर बदलून बसते.

घरातील अनेक व्यवधानामुळे तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. म्हणून तुम्हांला स्त्रीची टिंगल करायचा परवाना मिळत नाही. निखळ विनोद कशावर आणि कसा करावा ही बेसिक अक्कल असावीच सर्वांकडे, नाहीतर अशी मस्करीची कुस्करी होते.

हे जरुर ध्यानात ठेवा की अशी सतत बायकांची टिंगल करणारे लोक कुणालाच आवडत नाहीत. हे सभ्यतेचं लक्षणही नाही. बघा तुम्ही कुठल्या कॅटेगिरीत येताय?

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !