कालच एक बातमी वाचली. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ५ माजी आयुक्तांसह १८ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल.. शेजारच्या मित्राने बापरे म्हणत डोळे वटारले.. तेवढ्यात आमची गाडी दिल्लीगेटच्या रस्त्यावर धाडकन आदळली...
आमच्या नगरकरांना सवय झाली आहे गाडी खड्ड्यातून खालीवर करीत चालवायची. आम्हाला सहनशील नागरिक म्हणून जो शिक्का लागला आहे, तो आमचा गौरव आहे, असं आम्ही नेहमीचं मानतो..
कोणता रस्ता नीट नाही अन् कोणाची हिम्मतही नाही, रस्त्याला नावं ठेवायची की त्या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करायची? इतके वर्ष निमूटपणे शहराची सूरू असलेली दुर्दशा जर आम्ही सहन करतोय तर तुम्हाला तरी त्याचा त्रास का व्हावा.?
जगतोय ना...! फारशी मागणी नसतेच कधी आमची.. निवडणूक आली की तुमचे पंटर, कार्यकर्ते घरी येतात हात जोडत.. त्यातच आम्ही खूष होऊन जात असतो. घरातल्या चार पाच जणांना नोटांचे पाकीटे मिळाली तर चांगली होऊन जाते आमची एखादी संध्याकाळ.
लाखमोलाचं मत शे-पाचशे रुपयाला विकायला आम्हाला काही लाज वाटत नसेल तर रस्त्यावरील खड्डे काय घेऊन बसलात.? शहर हितासाठी मतदान करणाऱ्यांची संख्या कमी.. अन् पैशाची पाकिटे घेत मत देणाऱ्यांची रांग लांबच लांब असेल, तर हे असेच चालु रहाणार आहे...
आता तूम्ही म्हणाल, कल्याण डोंबिवली वरून तूम्ही नगरवर का घसरलात..? अहो, कल्याण डोंबिवलीचे अधिकारी तेवढे शहाणे नसतील जेवढे नगरमधे आहेत.. (काही प्रामाणिक अधिकारी निश्चित आहेत ) म्हणून नगरमधे असे खटले दाखल होत नसतील?
असं म्हणतात आमच्या महापालिकेत जर कोणाला मोठ्या पोस्टवर बदलून यायचं असेल तर त्याला वर मोठी पाकिटे द्यावी लागतात... का तर म्हणे नंतर पन्नास पट माल घेऊन जाता येतो इथून.. एकदा बदली झाली की संपला सगळा विषय...
ही ख्याती आहे महापालिकेची. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, इथल्या कॅफोला सुद्धा कामाचा चेक काढण्यासाठी आठ, दहा टक्के द्यावे लागतात. अहो, खरंच ना.. नुकताच महापालिकेतील कॅफो पैसे घेताना रंगेहाथ पकडला..
त्याच्या घराची झडती घेतली तर कोट्यवधी रुपयांच घबाड सापडलं. हा सगळा पैसा जनतेचा.. त्याने बेइमानीतून कमावलेला.. लोकांना नरक यातना भोगायल्या लावून..!
दोन दिवस बातम्या झळकल्या की काही दिवसात सगळं प्रकरण विसरलं जातं.. नंतर हेच अधिकारी सेटिंग करून धुतल्या तांदळासारखे पुन्हा हजर होतात. आपल्या उरावर बसत..!
हेच तर खरे दुर्दैव आहे.. इथले इंजिनिअर. यांना पुर्ण खात्री आहे की, या शहरात आपले कोणीही वाकडे करु शकत नाही.. टक्क्यात दाबून पैसा खायचा.. अन् पाहिजे त्या बिलांवर कोंबडा मारायचा.. तेरी भी चूप और मेरी भी चूप..
जनतेचा कुठे काय संबंध.? जनता मान खाली घालून पाहून न पाहिल्यासारखे करत नेत्यांची हुजरेगिरी करण्यात मश्गूल असते.. काही नगरसेवकच जर ठेकेदारीचा धंदा करीत असतील तर मग जनतेचा वाली तरी कोण राहणार.?
बोगस कामावर सह्या करायला या अधिकाऱ्यांना काही भीतीच उरली नसेल तर हे शहर तरी कधी सुधारणार.? गटार, रस्त्यांची, इतर कोणतीही बोगस कामे करायची. पुढची निवडणूक आली की घराघरात नोटा फेकायच्या.. असे धंदे सुरू असतील तर जाब विचारायचा कोणी.?
सगळी सेटिंग आहे. आपणं मुर्दाड आहोत. यापेक्षा दुसरा कोणता पुरावा हवा..? व्यक्त व्हायची हिंमत नाही,
आणि विकासावर बोलायला तोंड नाही.. एका 'क्वार्टर'साठी पैसे घेतल्यावर मत दिलं असेल तर तुमची तुलना तरी कोणाशी करायची.?
मतदान तुमचा हक्क असतो. तुमचा सन्मान असतो. ते दान करायचं असतं. पण तेच तुम्ही पैसे घेऊन स्वतःच सत्व विकत असाल तर तुमच्यापेक्षा 'ती' चांगली. ती तरी बिचारी पोटासाठी व्यवसाय करते पणं तिला तिचा सन्मान तरी असतो..
असे पैसे घेत स्वताला विकणाऱ्या प्रवृत्तीमुळे या शहराचे पुरते वाटोळे झाले आहे. त्यामुळे कोणत्या प्रश्नावर आवाज उठवण्याची यांची हिंमतही नाही. यांच्यामुळेच सारं शहर बदनाम झालय. शहराच खंडहर करून ठेवलं आहे या लोकांनी.
केवळ कोणत्या नेत्याने एखादी घोषणा केली की लगेच डोलीबाजा लावून डान्स करणारे आपण नगरकर. भले त्या घोषणा पुर्ण होवो ना होवो.! हे असंच चालु रहाणार आहे. कोणाचं काही वाकडं होणार नाही.
पालिकेचे अधिकारी खूप माया घेऊन इथून जातात, येतात.. आपण मात्र अंधारात. रस्त्यांच्या खड्ड्यात पडत. ठेचकाळत.. असंच म्हसणात जाणार आहोत एक दिवस...!
- जयंत येलूलकर (अहमदनगर)