फेब्रुवारी महिना सुरु होवून काही दिवस लोटून गेलेत. जरा जरा ऊन वातावरणात आहे. जरा जरा थंडीही जाणवते आहे. फ्रेंड्स, हा महिना आहे प्रेमाचा, कारण या महिन्यात जगभरात प्रेमदिन साजरा करण्यात येत असतो.
प्रेम देवाने माणसाला प्रदान केलेली अत्यंत गोंडस, निर्मळ अशी भावना. याच हळव्या, गहिऱ्या प्रेमाला उत्कटपणे आपल्या प्रिय व्यक्तीकडे व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे १४ फेब्रुवारी. ही पाश्चात्त्यांची धारणा हं..
पाश्चात्य देशांत हा दिवस ‘संत व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. चर्च मध्ये जाऊन प्रार्थना केली जाते. या दिवशी ख्रिश्चन धर्म मुख्य असलेल्या देशांत कामकाजाला सुट्टी दिलेली असते. १४ फेब्रुवारीचे महत्व सांगणाऱ्या अनेक दंतकथा प्रसिध्द आहेत.
हा दिवस साजरा करण्यामागे एक विशेष कारणही आहेच. अनेक दंतकथा पश्चिमेकडील देशात सांगितल्या जातात. पण त्यापैकी एक विशेष म्हणजे ‘ज्या काळी रोममधील सैनिकांना लग्न करण्याची परवानगी नव्हती, तेव्हा सैनिकांची लग्न लावून दिल्याबद्दल संत व्हॅलेंटाईन यांना तुरुंगवास देण्यात आला होता.
सुटकेच्या आधी जेलर एस्टेरियसच्या अंध मुलीस “तुझा व्हॅलेंटाईन” अशी सही केलेलं पत्र त्यांनी लिहिला होतं म्हणे. काहीजण मानतात की हेच पहिल प्रेमपत्र.
काय गंमत ना, आपल्यापैकी अनेकजण १४ तारखेच्या गुलाबी पत्रात सोनेरी, चंदेरी अक्षरात सही करतात ‘युअर व्हॅलेंटाईन’ परंतु खरतर ती एक महान संत आत्म्याची स्वाक्षरी आहे, ज्याने संदेश दिला.
निस्सीम प्रेमाचा, प्रेम करणाऱ्या अनेक हृदयांचे मिलन घडवलं यासाठी तुरुंग भोगला. पण आता संत व्हॅलेंटाईन डे हा सर्वत्र साजरा होणारा उत्सव झाला आहे. ‘eastern orthdox church, luthern church’ इथे तर संत व्हॅलेंटाईन डे हा ६ जुलै आणि ३० जुलैलाही साजरा केला जातो.
आपण आज ज्या प्रकारे हा प्रेमदिन साजरा करतो, तसं प्रथम इंग्लड देशात १८व्या शतकात शुभेच्छापत्रे आणि भेटवस्तू देऊन साजरा करण्यात आला. हा प्रेम सप्ताह जरुर साजरा व्हावा, मात्र हे आता आलेलं ओंगळवाणे स्वरुप आपणच टाळूया.!
आकर्षणाच्या पलिकडे एक भावनिक, मानसिक प्रांजळ नाते दोन मनात तयार होण्यासाठी 'विश्वास और प्रेम है सदा के लिए..' एवढचं हवं. पूर्ण आठवडा तरुणाई या प्रेमसप्ताहात रमलीय..
जे छान वाटतं, तुमच्या मनाला आनंद देतं ते जरुर करावं, पण समोरच्याच्या मनाचा पूर्ण विचार करुनच. कारण प्रेम करण्याचा जसा आपला हक्क आहे, तसा तो मान्य करण्याचा किंवा नाकारण्याचा समोरच्या व्यक्तीला देखील आहे.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)