पण त्यासाठी हवीत शहरावर प्रेम करणारी माणसं..

सुप्रभात प्रिय मित्र परिवार. रोज नवा उत्साह देत पहाट होतं आहे. आज मला लवकर जाग आली. जवळ आमचा जिमीही (लाडका कुत्रा) शांतपणे झोपलाय..

या प्रहरात सहज मनात विचार आला, गेल्या कित्येक दिवसात असं पहाटे पहाटे किल्ल्याजवळच्या रस्त्यावर फिरायला गेलो नाही आपण. आपल्या शहरानजीक काही ठिकाणी किती सुंदर वातावरण असतं ना..!

जरा कधी कॅम्प येथील रस्त्यांवरून चक्कर मारली की या मखमली वातावरणाच्या प्रेमात पडतो आपण कित्येकदा. या क्षणी आपला किल्ला डोळ्यासमोर आला.. इथे तर पहाटे मोर नजरेस पडतात आपल्या..

किल्ल्याच्या बुरुजावर तर कधी पायऱ्यांवर आपला पिसारा फुलवून सुंदर जग निर्माण करताना दिसतील आपल्याला हे मोर. बालपणी १5 ऑगस्टला माझे बाबा एकदा भुईकोट किल्ल्यावर घेऊन आले होते आम्हाला.

असं थोड थोड आठवतं. हे चांगलंच लक्षात आहे की, पूर्वी किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी झुलता पूल बांधलेला होता. याच झुलता पुलावरून बरेच नगरकर या दिवशी किल्ल्यात येत असत. हा जाड लोखंडी साखळदंडाने बांधलेला तरंगता पुल सुस्थितीत होता.

किल्ल्याच्या वास्तू कलेचा तो एक उत्तम नमुना होता. ही आपल्या अहमदनगरच्या निजामशाहीची खासियत होती.. चालण्यासाठी मोठ्या मजबूत लाकडी ओंडक्यांनी बांधलेल्या रस्त्यावरून जाताना वेगळा आनंद मिळत असायचा.

'असायचा'.. हे वाक्य दुर्दैवाने म्हणावे वाटते.. कारण आत्ता आत्ता पर्यंत सुस्थितीत असलेला हा पूल इतिहासात जमा झालाय.. तिथे आता केवळ लोखंडी साखळदंड उरली असून हे दृश्य एखाद्या खंडहर झालेल्या परिसरासारखं झालं आहे.

या झुलता पुलावरून चालण्याचा आनंद आपल्या मुलांना खरेच मिळायला हवा. मनात आणलं तर तो दुरुस्त होऊ शकतो. पण त्यासाठी, शहराच्या भविष्याचा वेध घेताना त्याच्या समृद्ध इतिहासावर प्रेम करणारीही माणसे हवीत.!

- जयंत येलुलकर (रसिक ग्रुप, अहमदनगर)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !