लहानपणी सांगलीत दरवेशी अस्वलं घेऊन फिरत. मला त्या अस्वलाची जाम भिती वाटत असे. कारण आई कधीतरी भिती घालायची सारखी सारखी झाडावर चढलीस ना देते बघ त्या अस्वलाला...
आजीमां दोन रुपये देऊन त्या दरवेशाकडून अस्वलाचा केस विकत घेत.. दृष्टीचा धागा करायला.. तो धागा मी कधीच बांधला नाही ते सोडा..!
पण दोन्हीही मुलींना दादा छान छान मोठे टेडी आणायचा ना ते मला भारी आवडायचे.. छोटी तर त्या टेडीला जवळ घेऊन झोपायची, जेवायला घालायची एवढचं काय शाळेत जाताना पाटीवर होमवर्कही देऊन जायची.
भय्या ते होमवर्क ती यायच्या आधी करुन ठेवी. होमवर्क केला नाही तर बिचारा टेडी फटकेही खात असे. मोठ्या लेकीची टेडी मात्र मीच म्हणजे ते पिलु मलाच लगडलेलं असायचं..
खरतरं प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक जिव्हाळ्याचा टेडी असायला हवा ना..? ज्या खांद्यावर आपण आश्वस्त होऊन डोकं ठेवून टिपं गाळता आली पाहिजेत... मनातलं गुज गाता आलं पाहिजे.
आपले मूड त्यानं हक्काने सांभाळावे, आपल्या वेडेपणात साथ द्यावी.. काही न बोलता आपल्या आसपास आपलं अस्तित्व ठेऊन फक्त आपलेच असणारे टेडी..
आपणही व्हावं असं कुणाचा तरी जिव्हाळ्याचा टेडी. सुजनहो, पहा कोण आहे तुमचा टेडी.. आणि तुम्ही आहात का कुणाचे टेडी..!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)